नाशिक MIDC कर्मचारी कामावरून अचानक बेपत्ता

नाशिक MIDC कर्मचारी कामावरून अचानक बेपत्ता
News Update | न्यूज अपडेटNews Update | न्यूज अपडेट

सातपूर | प्रतिनिधी Nashik

नाशिकच्या अंबड औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) येथील कर्मचारी कामावरून अचानक बेपत्ता झाल्याने ऐन दिवाळीच्या सणात कुटुंबीय आणि नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दिनकर रामचंद्र विशे (वय २५) असे या कर्मचाऱ्याचे नाव असून तो दि. २५ ऑक्टोबर रोजी अंबड एमआयडिसी मध्ये वॉटर सप्लाय रिडिंग घेण्यासाठी गेला होता....

यानंतर तो आजपर्यंत परत आलेला नाही. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दिनकरच्या हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र १० दिवसानंतर देखील तपासामध्ये कोणत्याही प्रकारची प्रगती झालेली नाही. त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर दिनकरचा शोध घ्यावा अशी विनंती दिनकरचे आई वडील आणि नातेवाईक यांनी पोलिसांना केली आहे.

मूळचा ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातल्या तोंडली गावचा दिनकर विशे, त्याचा चुलतभाऊ मीरज विशे, जयेश भोई, नितेश शिर्क आणि जिवन पश्टे असे पाच तरुण नोकरी निमित्त नाशिक मधील सातपुर एम आय डी सीच्या महींद्रा सर्कल येथील स्टाफ कॉलनीत राहतात. दिनकर हा अंबड एमआयडिसी मध्ये वॉटर सप्लाय रिडिंग घेण्याचे काम करत होता. नेहमप्रमाणेच दिनकर दिनांक २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास कामावर जाण्यासाठी निघाला होता.

रोज साधारण सायंकाळी ८ ते ९ च्या दरम्यान पुन्हा घरी येणारा दिनकर रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने त्याच्या सहकाऱ्यांनी त्याच्या माबाईलवर संपर्क केला असता तो बंद लागला.

त्यामुळे सर्व मित्रांनी त्याचा नाशिक शहर परीसरात रात्रभर शोध घेतला असता तो मिळुन आला नाही. दुसऱ्या दिवशी दिनेशचा चुलतभाऊ आणि मित्रांनी दिनांक २६ ऑक्टोबर रोजी सकाळी एमआयडिसी उद्योग भवन कार्यालय सातपूर याठिकाणी जाउन दिनकरची डयुटी शिफ्ट बघीतली असता दिनांक २५ ऑक्टोबर रोजी तो डयुटी शिटवर सही करून अंबड एमआयडिसी मध्ये वॉटर सप्लाय रिडिंग घेण्यासाठी गेल्याचे दिसून आले. शिवाय अंबड एम आय डी सी मधील बी ८१ ईले.ॲप अंबड या कंपनीत चौकशी केली असता तेथिल सिक्युरीटी गार्डने दिनकर कंपनीत रीडिंग घेऊन गेल्याची माहिती दिली.

परंतु त्यानंतर दिनकर कुठे गेला हे याबाबत कोणतीच माहिती मिळत नाही. अतिशय मेहनती, शांत व संयमी असलेला दिनकर अचानक बेपत्ता झाल्याने त्याचे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवार यामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी दिनकरच्या बाबतीत गांभीर्याने दखल घेऊन त्याचा लवकरात लवकर शोध घ्यावा अशी विनंती दिनकरचे आई वडील आणि नातेवाईक यांनी पोलिसांना केली आहे. तसेच दिनकरबद्दल कोणतीही माहिती मिळाल्यास, किंवा तो आढळल्यास गोविंद विशे (काका) यांच्याशी तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com