नाशिक | प्रतिनिधी

जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील वडाळीनजीक येथे बाळासाहेब झाल्टे यांच्या शेतात काल (दि ०१) रोजी सकाळी एक तीन ते चार दिवसांचे बिबट्याचे पिल्लू आढळून आले होते. यानंतर या पिलाला सुरक्षित रित्या निफाड रोपवाटिका येथे आणण्यात आले....

त्यानंतर तेथे डॉक्टर चांदोरे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली व पिल्लाची तब्येत व्यवस्थित असल्याचे सांगितले.

यानंतर या पिलास पुन्हा त्याचे आईच्या ताब्यात देण्याबाबतचा निर्णय झाला. त्यानुसार सायंकाळी 5 वाजता डॉक्टर सुजित नेवसे, सहाय्यक वनसंरक्षक, संजय भंडारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, येवला, जाधव, वनपाल मनमाड महाले, वनरक्षक विंचुर, विलास देशमुख वनसेवक व इतर स्टाफ घेऊन, वडाळी नजिक येथे गेले.

पिलाची व मादीची भेट घडविणे आवश्यक असल्याने त्यानुसार संचार बघून याठिकाणी सापळा रचण्यात आला. याठिकाणी पिल्लू मोठे असल्यामुळे ते भरकटत जाण्याची शक्यता होती त्यामुळे त्यास लोखंडी जाळी खाली झाकून ठेवण्यात आले.

ही जाळी एका दोरीने बांधण्यात आली व याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. मध्यरात्री पिलाच्या शोधात मादी शेतात फिरत होती. आपल्या पिलाजवळ मादी गेल्यानंतर, जाळीची दोरी खेचून पिलास मोकळे करण्यात आले.

यावेळी पिल्लू धावतच मादी बिबट्याजवळ गेले. यानंतर मादी पिलास घेऊन निघून गेली. यावेळी नितीन गुदगे मुख्य वनसंरक्षक, तुषार चव्हाण, उपवनसंरक्षक पूर्वभाग नाशिक यांचे मार्गदर्शन लाभले.

तसेच इको एको संस्था नाशिकचे राहूल कुशारे व वडाळी नजिक येथील ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.