नाशिकसह इगतपुरी तालुक्यातील रस्ते होणार चकाचक

खासदार हेमंत गोडसे यांची माहिती...
नाशिकसह इगतपुरी तालुक्यातील रस्ते होणार चकाचक

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी

केंद्रीय रस्ते व दळणवळ मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसह नुतनीकरणासाठी तब्बल १४.१३ कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. निधीच्या उपलब्धतेमुळे नाशिक लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांचा कायापालट होण्यास मदत होणार असून दळणवळण सुलभ होणार आहे...

नाशिक लोकसभा मतदारसंघात रस्त्यांची दुरवस्था झाल्याने या रस्त्यांचा कायापालट करणेकामी खा. गोडसे गेल्या काही वर्षांपासून केंद्राकडे प्रयत्नशील होते. नाशिक लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांचा सर्वागिण विकास होवून या भागातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल नाशिकसह इतर बाजारपेठांमध्ये वाहतूक करणेकामी सुलभ रस्ते उभारण्याचा मानस खा. गोडसे यांचा होता.

यासाठी खा. गोडसे यांनी अनेकदा केंद्रीय रस्ते व दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवून रस्ता कामांसाठी निधी मंजूर करणेबाबत पाठपुरावा केला होता. दरम्यान, सोमवारी (दि.२६) केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री गडकरी यांनी ट्विट करुन नाशिक लोकसभा मतदारसंघातील चार विशेष रस्ता कामांसाठी तब्बल १४.१३ कोटींचा निधी मंजूर केला आहे.

या कामांमुळे नाशिक लोकसभा मतदारसंघातील दळणवळण सुलूभ होण्यास मदत होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतमाल इतरत्र वाहतूक करणेकामी जलद रस्ते उपलब्ध होणार असल्याने या रस्त्यांवरील समस्या सुटण्यास मदत होणार आहे, दरम्यान लवकरच या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली.

या रस्त्यांचा होणार कायापालट

यामध्ये इगतपुरी तालुक्यातील भगुर-लहावित-मुंढेगाव रोड (एम.डी.आर.२१) या रस्ता कामासाठी २.४५ कोटींचा तर नाशिक तालुक्यातील अंजनेरी मुळेगाव-जातेगाव-राजुबहुला-गौळाणे-विल्होळी रोड (एम.डी.आर.-१९) यासाठी ४.८५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

याशिवाय नाशिक तालुक्यातील वाडीवऱ्हे-दहेगाव-जातेगाव-महिरावणी-गिरणारे रोड (एस.एच.३७) या रस्त्याच्या विकासासाठी ४.८७ कोटीचा निधी आणि नाशिक तालुक्यातील गंगापूर-दुगाव रोड (एम.डी.आर. ३४) या रस्ता कामासाठी तब्बल १.९६ कोटींचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती केंद्रीय रस्ते व दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी व्टिट्‌ करुन दिली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com