स्पाईसजेटकडून आता हैद्राबाद-नाशिक-सुरत विमानसेवा; २८ मार्चपासून होणार सुरु

स्पाईसजेटकडून आता हैद्राबाद-नाशिक-सुरत विमानसेवा; २८ मार्चपासून होणार सुरु
Spice Jet

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक आता अनेक शहरांशी हवाई सेवेद्वारे जोडले गेले आहे. नाशिकमधून विमानसेवेला लाभलेला अभूतपूर्व प्रतिसाद बघता आता स्पाईस जेटकडून हैद्राबाद-नाशिक-सुरत अशी विमानसेवा सुरु करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. पुढील महिन्यात २८ मार्चपासून ही सेवा सुरु होणार असून आठवड्यातील रविवार वगळता इतर सर्व दिवस विमानसेवा दिली जाणार आहे. याबाबतची माहिती निमाचे समन्वयक मनीष रावल यांनी देशदूतशी बोलताना दिली...

ते म्हणाले, नाशिक हैद्राबाद विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पर्यटनाच्या दृष्टीने दक्षिण भारतात जाणाऱ्या पर्यटकांना ही विमानसेवा सोयीची झाली आहे. आता स्पाईस जेटने ही सेवा वाढविण्यात येणार असल्याचे संकेत दिले असून हैद्राबादहून निघालेली फ्लाईट नाशिकमध्ये थांबून त्यानंतर ती सुरतपर्यंत झेपावणार आहे.

यातून नाशिकमध्ये येणाऱ्या आणि नाशिकमधून सुरतला जाणाऱ्या व्यापाऱ्यांना सोयीची अशी ही सेवा ठरणार असून व्यापारी वर्गाकडून या सेवेची मागणी खूप आधीपासून होत होती. आता त्यांना ये-जा करण्यासाठी आधी सोयीस्कर ही विमानसेवा ठरेल असे दिसते आहे.

दुसरीकडे नाशिक म्हणजे मंत्रभूमी ते तंत्राभूमीपर्यंत वाढलेले शहर आहे. पर्यटनाचा विचार केल्यास दरवर्षी लाखो पर्यटक नाशिकसह परिसरात पर्यटनासाठी येतात. धार्मिक नगरी असल्यामुळे नाशिकला अग्रगण्य स्थान प्राप्त झाले आहे. त्यामुळे गुजरात आणि हैद्राबाद येथी पर्यटक नाशकात येण्यासाठी या विमानसेवेचा लाभ नक्की घेतील यादृष्टीकोनातून या विमानसेवेला अधिक फायदा होणार आहे.

दुसरीकडे नाशिकमधून अनेक प्रकारची कार्गो वाहतूक होते आहे. त्यामुळे नाशिकचा ताजा माल इतर शहरांत पोहोचण्यासाठी या विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळू शकतो. यादृष्टीकोनातून स्पाईसजेटने विचार करत या विमानसेवेची व्याप्ती वाढवलेली दिसते आहे.

कमी वेळेत, कमी खर्चात चांगली सुविधा देणाऱ्या विमानसेवेला नाशिककर प्रतिसाद देतातच. त्यामुळे ही विमानसेवादेखील अभूतपूर्व प्रतिसादात चालेल असा विश्वास रावल यांनी व्यक्त केला आहे.

नाशिकमध्ये कनेक्टीव्हीटी निर्माण झाल्यास याठिकाणी नवे उद्योग येण्यास सुगीचे वातावरण निर्माण होईल. परिणामी, रोजगाराच्या संधी उपलब्ध होती. शहरातील मनुष्यबळ शहरात वापरले जाईल. यामुळे शहराचा आर्थिक विकास साधला जाणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com