नाशिक | प्रतिनिधी

हा काळ निसर्गाच्या मेकओव्हरचा. फक्त वरवरचा नव्हे. अगदी मुळापासुनचा. कात टाकून नव्याने जन्म घेण्याचा. निसर्गाची रंगपंचमी सुरु झाली आहे. हा, वठलेलं झाड पुन्हा बहरण्याचा ऋुतू. वसतांच्या चाहुलीने त्याला देखील नवपालवी फुटते. जिवंतपणा त्याच्या फांद्याफांद्यातून वाहू लागतो...

रसरशित पाने उमलून उठतात. माणसाच्या स्वागतासाठी पिवळाधमक बहावा मांडव घालतो. जांभळा जॅकरंडा जांभळ्या फुलांचा सडा घालतो. फांद्या गायब करुन गुलमोहोर फक्त फुले उधळतो. उन्हाच्या काहिलीची वर्णी देणारा लालभडक पळस तुमचीच वाट बघत असतो.

ही अनुभूती घेणं कोणा एकाची मक्तेदारी नाही. कोणालाही शक्य आहे ते. पण त्यासाठी आळस झटकावा लागतो. उबदार पांघरुणाचा मोह सोडावा लागतो. निग्रहाने भल्या पहाटे घराबाहेर पडावं लागतं. गाडी बाजूला सारावी लागते.

पायी चालावं लागतं. बाहेर पडताना मोबाईल हमखास घरी विसरुन जावा लागतो. घरापासुन थोडं लांब जावं लागतं. अर्थात अजून तरी निसर्ग आपल्याला सोडून जंगलात निघून गेलेला नाही. नजरेला सुखावणारी हिरवाई बघण्यासाठी फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत. तेव्हा एकदा रुटीन ब्रेक करुन तर पहा.

जरा उठा आणि बाहेर पडा. बघा निसर्ग खराखुरा बदलतो आहे. बदलाचा पदरव सुरु झाला आहे. नवपालवीचा उग्र गंध नाकाला झोंबायला लागला आहे. 'जुने जाऊ द्या मरणालागुनी' असे म्हणणार्या कविकल्पनेप्रमाणे जीर्ण पानं वार्याच्या मंद लहरीबरोबर पुढच्या प्रवासाला निघाली आहेत.

मागे उरले आहेत फांद्यांना फुटलेले कोवळे कोंब. त्यांच्या रूपाने झाडांनी जणू नवपालवीच्या पोपटी रंगाची शाल पांघरली आहे.

दोस्तांनो, वसंताचे हे लोभस रुपडं फार काळ टिकणारं नाही. वसंत आला म्हणता म्हणता तो जाईल सुद्धा. मग उरेल तो ग्रीष्म. जीवाची तगमग करणारा. तेव्हा वसंताचं दर्शन घेण्यासाठी आत्ताच बाहेर पडायला हवं. त्यासाठी भली पहाट हीच योग्य वेळ. हवेत सुखद गारवा असतो. कोकिळेची भुपाळी सुरु असते. साथीला पक्षांची किलबिल असते. वातावरणात नवपालवीचा उग्र गंध भरुन राहिलेला असतो. पुर्वेला चुकार तांबड फुटू लागलेलं असतं. जिकडे तिकडे फक्त निसर्गायन सुरु असतं.

वसंतात सगळा निसर्ग नटतो. सगळीकडे पुष्पसंमेलन भरतंं. वसंताच्या दरबारात अनेक जण हजेरी लावतात. प्रत्येक झाड वेगळं, त्याची फुलं वेगळी, रंग वेगळा, गंध वेगळा. कोणाकोणाचं म्हणून नाव घ्यावं? नजरेत भरतो तो पळस, पांगारा, झाडभर फुलांचा मळवट भरलेला चाफा. कडुनिंब पांढर्या तुर्यांच्या मुंडावळ्या बांधून उभा असतो. वसंताची कमाल अशी की पिंपळ सुद्धा देखणा वाटतो.

काही अनोळखी पाहुणे देखील तुमचं स्वागत करतात. निसर्गाच्या साथीने चालता चालता मनातल्या तारा झंकारतात. एका कोपर्यात पं. भीमसेन जोशींचा दमदार आवाज घुमू लागतो. केतकी गुलाब जुही चंपक वन फुले..मनाच्या दुसर्या कोपर्यात पं. जसराज गायला लागतात. सब राग बने बाराती....दुल्हा राग बसंत...मग आशा भोसले गुणगुणू लागते..वृक्षलतांचे देह बहरले .. फुलाफुलातुन अमृत भरले

वनावनातुनी गाऊ लागल्या.. पंचमात कोकिळा..आला वसंत ऋतु आला....

दोस्तांनो, वसंत ऋतुचं स्वागत करण्याचं अजून एक कारण तुम्हाला माहिती आहे?

वसंत येतांना नवचैततन्य आणतो. त्याच्या भैरवीत वर्षाऋतुची बीजं दडलेली असतात. वसंत मावळत असताना चराचर सृष्टीला पावसाचे वेध लागतात. मेघगर्भ वाढायला लागतो. मेघांमध्ये पावसाची गर्भधारणा याच काळात होते असं म्हणतात. मग काय, एखाद्या रविवारी भल्या पहाटे एखाद्या पायवाटेवर नक्की भेटू या.