Video : नाशिकला पहिल्यांदाच दिल्लीत 'मान'; डॉ. भारती पवार यांनी घेतली केंद्रीय मंत्रीपदाची शपथ

Video : नाशिकला पहिल्यांदाच दिल्लीत 'मान'; डॉ. भारती पवार यांनी घेतली केंद्रीय मंत्रीपदाची शपथ

नाशिक | विजय गीते Nashik

केंद्रीय मंत्रिमंडळात डॉ. भारती पवार (Union Minster Dr Bharati Pawar) यांचा समावेश झाल्याने नाशिकला केंद्रात प्रथमच थेट मंत्रीपद मिळाल्यामुळे नाशिकच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. नाशिकच्या भूमिपुत्राला आजवर केंद्रात मंत्रीपद मिळालेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळ विस्तारात दिंडोरीच्या डॅा.भारती पवार (Dr Bharati Pawar) यांना संधी मिळाल्याने ते नाशिकला दिल्लीत पहिले मानाचे पान ठरले आहे.

आगामी मुंबई महापालिका निवडणुका व राज्यातील महाविकास आघाडीच्या वारूला रोखण्यासाठी नव्या दमाची टीम म्हणून या मंत्रिमंडळ विस्ताराकडे पाहिले जात आहे. यामध्ये दिंडोरी (नाशिक) मतदारसंघातून पहिल्यांदाच लोकसभेवर निवडून गेलेल्या डॉ.पवार यांना संधी मिळाली आहे.

नाशिक जिल्ह्यातील नेत्याला केंद्रात मंत्री म्हणून अद्याप संधी मिळालेली नाही.नाशिकहून गो.ह.देशपांडे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी सुरवातीच्या काळात खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे.सन १९६२ मध्ये भारत- चीन युद्धानंतर पंतप्रधान पंडीत नेहरू यांनी यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीत बोलावून घेऊन संरक्षणमंत्री केले.

तेव्हा झालेल्या पोटनिवडणूकीत परस्पर सहमतीने चव्हाण यांना नाशिक मतदारसंघातून नाशिककरांनी बिनविरोध निवडून दिले आहे.कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी या निवडणूकीतून तेव्हा माघार घेतली होती.

याची परतफेड म्हणून ओझर (नाशिक) येथे चव्हाण यांनी एचएएल प्रकल्प देत नाशिककरांना एक अनोखी भेट दिलेली आहे. धुळे लोकसभा मतदारसंघांमध्ये येणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव व बागलाण या तालुक्याचेही प्रतिनिधित्व करणाऱ्या डॉ. सुभाष भामरे यांनाही केंद्रीय मंत्रिमंडळात गतवेळी संधी मिळालेली आहे.

नाशिकमधून यानंतर आण्णासाहेब कवडे, विठ्ठलराव हांडे, प्रतापराव वाघ, मुरलीधर माने, डॅा.वसंतराव पवार (सर्व काँग्रेस), माधवराव पाटील, देवीदास पिंगळे, समीर भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस), भाजपचे डॅा. डी. एस. आहेर, शिवसेनेचे राजाभाऊ गोडसे,

अॅड. उत्तमराव ढिकले, हेमंत गोडसे खासदार झाले. दिंडोरीतून काँग्रेसचे झ़ेड. एम कहांडोळे, जनता दलाचे हरिभाऊ महाले, भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण व सध्याच्या डॉ.भारती पवार यांनी प्रतिनिधीत्व केले. याशिवाय सुरगाणा संस्थानचे महाराज धैर्यशीलराव पवार सलग पंचवीस वर्षे राज्यसभेवर होते.

देवळालीचे बाळासाहेब देशमुख हे देखील राज्यसभा सदस्य होते.यातील बहुतांश नेत्यांचा समाजात मोठा प्रभाव होता.मात्र, केंद्रीय मंत्रीपदाची संधी त्यांना मिळाली नाही.मात्र, डॅा पवार यांना संधी मिळाल्याने त्या नाशिकच्या भूमिपुत्र म्हणून पहिल्या केंद्रीय मंत्री ठरल्या आहेत.

आक्रमक भारती पवार...

पुण्याच्या भारती विद्यापीठातून वैद्यकीय शाखेची पदवी घेतलेल्या डॉ.भारती पवार या मुळच्या दळवट (ता.कळवण) या आदिवासी तालुक्यातील आहेत. त्यांचे माहेर व सासर दोन्ही नाशिकचे. त्यांचे पती प्रवीण पवार हे अभियंता आहेत. सासरे तत्कालीन आदिवासी मंत्री स्व.ए.टी. पवार हे अत्यंत लोकप्रिय व विकासकामांमुळे परिचीत झालेले नेते होते.

कळवण विधानसभा मतदारसंघातून त्यांनी सलग पाच वेळा प्रतिनिधित्व केले आहे. त्यांना दोन वेळा राज्यमंत्री पद मिळाले. त्यांचा वारसा म्हणून डॅा. भारती पवार सलग दोन वेळा उमराणे व मानूर गटातून जिल्हा परिषद सदस्य झाल्या.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या प्रदेश उपाध्यक्षही होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या त्या सक्रीय व आक्रमक पदाधिकारी राहिल्या आहेत.सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने डॉ. पवार यांना उमेदवारी दिली होती.त्यात त्यांचा परावभव झाला.

2019 च्या निवडणुकीच्यावेळी डॉ.भारती पवार यांना पक्ष आपल्याला डावलत असून आयात उमेदवाराला उमेदवारी देत असल्याचे लक्षात येताच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.भाजपामध्ये प्रवेश करताच त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली आणि त्या खासदार झाल्या आणि आता केंद्रात मंत्रीही झाल्या आहेत. याबरोबर त्यांच्याकडे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष पदाचीही जबाबदारी पक्षाने दिलेली आहे. डॉ. पवार यांचा कुपोषणावर उत्तम अभ्यास आहे. त्यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा असतो.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com