जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रावखंडे सक्तीच्या रजेवर

व्हेंटिलेटरवरून पालकमंत्री भुजबळांनी झापले
जिल्हा रुग्णालय
जिल्हा रुग्णालय

नाशिक । Nashik

जिल्हाभरात करोनाचा उद्रेक झाला असताना व्हेंटिलेटर, ऑक्सीजन बेडबाबत जिल्हा रुग्णालयातील दिरंगाई आणि गलथान कारभाराबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शल्यचिकित्सकांसह आरोग्य अधिकार्‍यांना धारेवर धरले.

करोना आढावा बैठकीनंतर भुजबळ यांनी आरोग्य मंत्र्यांशी फोनद्वारे संवाद साधत नाराजी व्यक्त केली यानंतर तासाभरातच जिल्हा रूग्णालाच्या शल्यचिकित्सक डॉ.रत्ना रावखंडे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.

नाशिक शहर व जिल्हा करोना सद्यस्थिती व उपाययोजना आढाव्याची बैठक राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत काल पार पडली. यात भुजबळ यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला.

यावेळी नाशिक जिल्ह्यासाठी 228 व्हेंटिलेटर प्राप्त झाले असून त्यातील केवळ 196 व्हेंटिलेटर बसवण्यात आले. त्यातील केवळ ग्रामीण मध्ये सात आणि जिल्हा रुग्णालयात सात असे एकूण 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर रुग्ण उपचार घेत आहे.जिल्हा रुग्णालयात बसवण्यात आलेल्या 80 व्हेंटिलेटर पैकी फक्त 7 व्हेंटिलेटर रुग्णांच्या वापरात होते आणि पैकी 73 व्हेटिलेटर हे नॉन कोविड भागात विनावापर पडून आहेत.

तसेच 23 व्हेटिलेट अद्याप कार्यान्वित न करता तसेच जिल्हाभरात पडून असल्याचे समोर आले. व्हेंटिलेटर न मिळाल्याने एकीकडे रुग्ण दगावत असताना दुसरीकडे जिल्हा रुग्णालयातील अशा हलगर्जीपणामुळे पालकमंत्र्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

तर विभागीय मुख्यालय असलेल्या नाशिक जिल्हा रुग्णालयात केवळ 100 बेड कोरोनसाठी ठेवण्यात आले. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील उपजिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालयामधील डेडिक्टेड कोरोना रुग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आले नाही.

या हलगर्जीपणा आणि दिरंगाई बाब जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रत्ना रावखंडे यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाले नाही.जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर असतांना जिल्हा रुग्णालयाकडून होत असलेल्या दिरंगाई बाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बैठकीनंतर तातडीने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी संपर्क करून ही गंभीर परिस्थिती त्यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर तासाभरातच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रत्ना रावखंडे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com