
नाशिक | Nashik
नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनच्या (Nashik District Labor Federation Election ) संचालकपदांच्या बारा जागांसाठी रविवारी (दि.२५) रोजी ९६.७३ टक्के इतके विक्रमी मतदान (voting)झाले होते. एकूण १०८२ सभासद मतदारांपैकी १०४७ सभासद मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यामध्ये सहा तालुक्यामधून शंभर टक्के मतदान झाले होते...
त्यानंतर आज (दि.२६) सकाळी आठ वाजेपासून काशी माळ मंगल कार्यालय, द्वारका या ठिकाणी मतमोजणीस सुरुवात झाल असून निकाल हाती येत आहेत. यामध्ये येवल्यात भुजबळ यांच्या गटाची सरशी झाल्याचे पाहायला मिळत असून याठिकाणी आमदार दराडे बंधूंना धक्का बसला आहे. येवल्यातून सविता धनवटे विजयी झाल्या आहेत.
याशिवाय सिन्नर तालुका संचालक पदासाठी अतिशय अटीतटीच्या लढतीत आमदार कोकाटे यांच्या गटाचे विद्यमान संचालक दिनकर उगले यांना पराभवाचा धक्का बसला असून आमदार कोकाटे यांचे बंधू भरत कोकाटे विजयी झाले आहेत.
तर नाशिक संचालक पदासाठी झालेल्या निवडणुकीत विद्यमान संचालक मुन्ना हिरे यांना पराभवाचा धक्का बसला असून या प्रवर्गातून शर्मिला कुशारे या विजयी झाल्या आहेत. तसेच चांदवडमधून शिवाजी कासव विजयी झाले आहेत. तर अनुसूचित जाती जमाती गटामधून शशिकांत उबाळे हे आघाडीवर असून भटक्या विमुक्त जाती जमातीमधून राजाभाऊ खेमनार हे आघाडीवर आहेत.
तसेच इतर मागासवर्गीय प्रवर्गातून अर्जुन चुंबळे हे आघाडीवर असून महिलांसाठी राखीव वर्गातून दिप्ती पाटील आणि कविता शिंदे आघाडीवर आहेत. तर दुसरीकडे उमेदवारांच्या विजयाची घोषणा होताच त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत ढोलताशांचा गजरात गुलालाची उधळण केली.