
नाशिक | Nashik
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील ४८ पैकी ०३ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या होत्या. त्यानंतर काल ४५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच १५ ग्रामपंचायतीमधील (Grampanchyat) सरपंच आणि सदस्यांच्या १८ रिक्त जागांसाठी मतदान (Voting) पार पडले होते. यात सकाळपासूनच मतदारांनी उत्स्फुर्तपणे घराबाहेर पडत मतदान केले होते. त्यानुसार साडेपाच वाजेपर्यंत जिल्ह्यात ८२.३५ टक्के मतदान झाले होते.
यानंतर आज काही ठिकाणी सकाळी ८ वाजेपासून तर काही ठिकाणी सकाळी १० वाजेपासून मतमोजणीस सुरुवात झाली असून विजयी उमेदवारांचे निकाल हाती येत आहेत.यातील नाशिक तालुक्यातील पिंपळगाव गरुडेश्वर ग्रामपंचायतीत बाळू वाळू डंबाळे (शरद पवार गट) विजयी झाले असून बागलाण तालुक्यातील भवाडे ग्रामपंचायतीत अनिल तुळशीराम मोरे विजयी झाले आहेत. तर इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो ग्रामपंचायतीत ठाकरे गटाच्या अनिता राक्षे विजयी झाल्या आहेत.
तसेच नाशिक तालुक्यातील सुभाषनगर ग्रामपंचायतीवर अपक्षांचा झेंडा फडकला असून याठिकाणी अपक्ष उमेदवार मनीषा फसाळे सरपंचपदी विजयी झाल्या आहेत. याशिवाय सटाणा तालुक्यातील चिराई ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपच्या शकुंतला पाटील विजयी झाल्या आहेत. तर इगतपुरी तालुक्यातील दौंडत ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कॉंग्रेसचे पांडू मामा शिंदे विजयी झाले आहेत.तसेच इगतपुरी तालुक्यातील मोगरे ग्रामपंचायत आणि निफाड तालुक्यातील एका ग्रामपंचायतीत मनसेचा उमेदवार सरपंचपदी विजयी झाला आहे.