केदा आहेर (अध्यक्ष, जिल्हा बँक)
केदा आहेर (अध्यक्ष, जिल्हा बँक)
नाशिक

नाशिक जिल्हा बँकेची 'सामोपचार कर्ज परतफेड योजना २०२० '

योजनेत जास्तीत जास्त सभासदांनी सहभागी व्हावे - केदा आहेर, अध्यक्ष-जिल्हा बँक

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

कर्ज वसुलीसाठी नाशिक जिल्हा बँकेने थकबाकीदारांकडे पुन्हा मोर्चा वळविला असून थकबाकीदारासांठी आकर्षक ' सामोपचार कर्ज परतफेड योजना २०२० ' जाहीर केली आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या थकबाकीदारांना एकूण थकबाकीवर आकारण्यात येत असलेल्या व्याजावर ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आर्थिक डबघाईतून बाहेर काढण्यासाठी ही वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे.

या योजनेत थकबाकीच्या अनुषंगाने ७५ हजार ते साडेचार लाखापर्यत सवलत थकबाकीदारांना मिळणार आहे. ही योजना दि. १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२० या कालावधी करताच सुरू राहणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा बँकेच्यावतीने करण्यात आले आहे.

जिल्हा बँक नोटाबंदी, थकबाकीमुळे अडचणीत असल्यामुळे बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याकरीता अध्यक्ष केदा आहेर यांनी थकबाकी वसुलीसाठी कठोर पावले उचलली होती. विविध कार्यकारी संस्थाच्या मोठे थकबाकीदार प्रभावशाली थकबाकीदार यांच्यावर सहकार कायदा नियम १०७ अन्वये बँकेचे नाव लावून जमीन जप्ती करून जमिनीच्या लिलावाच्या प्रक्रिया करण्यात आली होती.

मात्र,गत दोन वर्षातील दुष्काळ, ओला दुष्काळ, अवकाळी पाऊस यासह आलेल्या नैसर्गिक आपत्ती तसेच कर्जमाफी योजनाचे अंबलबजावणीमुळे बँकेची थकबाकी मोठया प्रमाणात वाढलेली असून बँकेचे अनुत्पादक कर्जाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कर्ज वसुलीसाठी प्राथमिक शेती संस्थास्तरावरील व थेट कर्जाच्या थकबाकीदार सभासदांकडील थकबाकी वसूल होणे आवश्यक असल्याने तसेच प्राथमिक शेती संस्था व थकबाकीदार सभासदांकडून जुन्या सामोपचार योजने ऐवजी नवीन आकर्षक योजना जाहीर करत त्यांनी संधी दिली आहे.

बँकेची सध्याची सुरु असलेली सामोपचार कर्ज परतफेड योजना (ओटीएस) तसेच बँकेचा वाढलेला एनपीए व त्यानुसार असलेल्या कालनिहाय व रक्कमनिहाय थकबाकीचे व अपेक्षित वसुलीचे अवलोकन करून नाबार्ड व आरबीआय यांच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन बँकेच्या संचालक मंडळाने पुढीलप्रमाणे नवीन सुधारीत सामोपचार कर्ज परतफेड योजना २०२० या नावाने राबविण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे कर्जदारांना दिलासा मिळण्यासह बँकेची वसुली वाढण्यास मदत मिळणार आहे.

यांना मिळणार योजनेचा लाभ

३० जून २०१६ अखेरीस विविध कार्यकारी संस्था पातळीवर थकीत असलेले सर्व प्रकारचे शेती व शेती पूरक ( अल्पमुदत,मध्यम मुदत, दीर्घ मुदत ) संपूर्ण येणे कर्ज व बँकेमार्फत वितरीत केलेल्या थेट कर्ज पुरवठा योजनेंअंतर्गत थकीत झालेले सर्व थकबाकीदार सभासद या योजनेस पात्र राहतील.

एकूण कर्जबाकी (मुद्दल) - व्याज सवलतींची जास्तीत जास्त मर्यादा

एक लाखापर्यंत रक्कम - ५० टक्के किंवा ७५ हजार यापैकी जे कमी असेल ते

१ लाख ते तीन लाखांच्या आतील- ५० टक्के किंवा १.५० लाख यापैकी कमी असेल ते

३ लाख ते ५ लाखांच्या आतील- ५० टक्के किंवा २.५० लाख यापैकी कमी असेल ते

५ लाख ते १० लाखांच्या आत- ५० टक्के किंवा ३.५० लाख यापैकी कमी असेल ते

१० लाखांच्या वर- ५० टक्के किंवा ४.५० लाख यापैकी कमी असेल ते

कर्जमाफीमध्ये जे शेतकरी सभासद पात्र झालेले नसतील अशा थकबाकीदार सभासदांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन नवीन पीक कर्ज घेण्यासाठी पात्र व्हावे या हेतूने ही योजना लागू केलेली आहे. तरी, संचालक मंडळाच्यावतीने या योजनेत जास्तीत जास्त सभासदांनी सहभागी व्हावे.

केदा आहेर (अध्यक्ष, जिल्हा बँक)

Deshdoot
www.deshdoot.com