अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पाथर्डी शिवारातील धक्कादायक घटना

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पाथर्डी शिवारातील धक्कादायक घटना

इंदिरानगर | वार्ताहर

शेतावर मजुरीचे काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञानाचा फायदा घेऊन वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने पीडीत मुलगी गर्भवती राहिली होती. यानंतर एका संशयिताच्या विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एका गावात पीडित आपल्या कुटुंबासह राहते. अचानक पिडितेच्या पोटात दुखू लागल्याने तिला तातडीने गावातील सरकारी दवाखान्यात औषध उपचारासाठी दाखल करण्यात आले.

डॉक्टरांनी औषध उपचार करून पीडित गरोदर असल्याचे सांगितले. त्यावेळी घरच्यांनी तिला विचारले असता तिने सांगितले की, पाथर्डी गाव येथील द्राक्ष मळ्यात सप्टेंबर 2020 मध्ये कामासाठी आले असता कांतिलाल गवळी नामक व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केला असल्याचे समोर आले.

पीडिताला जास्त त्रास होऊ लागल्याने नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात आणले असता ती बाळंतीन झाली. तिने एका मुलाला जन्म दिला होता, मात्र नवजात बालकाचे निधन झाल्याचे संबंधित डॉक्टरांनी सांगितले.

याप्रकरणी कांतीलाल गवळी याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनी सतिष जगदाळे अधिक तपास करीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com