
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
स्वतःला आरोग्यदूत म्हणवून घेणारा तुषार जगताप हा गुटखा माफिया निघाल्याचे पोलीस तपासात उघड झाल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे...
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुंबई-आग्रा महामार्गावर इगतपुरी पोलिसांच्या पथकाने मुंबईकडे जाणारे गुटख्याने भरलेले दोन कंटेनर पकडून सुमारे सव्वा कोटींचा अवैध गुटखा जप्त केल्याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यात मुख्य संशयित आरोपी राज किशनकुमार भाटिया (३८, रा. जयपूर, राज्य राजस्थान) यास (दि.२३ जून) जयपूर येथून अटक करण्यात आली होती. राज भाटिया हा दिल्ली व जयपूर येथून सुत्रे हलवून बंद कंटेनरमध्ये गुटखा लपवून देशातील विविध राज्यांमध्ये गुटख्याची मोठ्या प्रमाणावर तस्करी करत होता.
नाशिक ग्रामीणमध्ये दाखल गुटखा तस्करीच्या गुन्ह्यांमध्ये गेल्या ०२ ते ०३ वर्षांपासून फरार होता. तपासा दरम्यान तो सन २०२१ पासून नाशिक येथील तुषार जगताप याच्या संपर्कात होता व त्याच्या मदतीने महाराष्ट्रातील अवैध गुटख्याचे नेटवर्क चालवत होता. यावरून इगतपुरी पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करून तुषार कैलास जगताप (३६,रा. त्रिमुर्ती नगर,नाशिक) यास पोलिसांनी अटक केली.
तुषार जगताप हा त्याचे गुटखा तस्करीमधील परराज्यातील साथीदारांसह नेटवर्क चालवून नाशिक जिल्ह्यात गुटख्याची मोठया प्रमाणावर तस्करी करत होता. जिल्ह्यातील अवैध गुटखा नेटवर्कचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ग्रामीण पोलिसांची पथके कारवाई करत असून राज भाटिया याचा नाशिक शहरातील हस्तक जगताप याच्या अटकेमुळे गुटखा तस्करीची राज्यातील पाळेमुळे खोदण्यास पोलिसांना मदत होणार आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू सुर्वे करीत आहेत.