अवघ्या सातशे रुपयांसाठी मित्रानेच केला मित्राचा खून

स्थानिक गुन्हे शाखेने केला उलगडा
अवघ्या सातशे रुपयांसाठी मित्रानेच केला मित्राचा खून

नाशिक । प्रतिनिधी

हातउसने घेतलेल्या ७०० रूपयांसाठी मित्रानेच मित्राचा खुन केल्याची घटना उघडकीस आली आहे. ग्रामिण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने खुबीने तपास करीत या खुनाचा उलगडा केला असून याप्रकरणी सातपूर येथील संशयित मित्रास अटक केली आहे.

संदिप मनोहर सोनवणे (२६, रा. बाहुले मळा, अशोकनगर, सातपूर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे, तरअशोक बारकु महाजन (३८, रा. आयटीआय कॉलनी, श्रमिकनगर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाजन यांचा मृतदेह सिन्नर तालुक्यातील महोदरी घाटात १९ जुलै रोजी बेवारस स्थितीत आढळून आला होता. डोक्यात मार लागलेला असल्याने हा खूनाचा प्रकार असल्याचे लक्षात घेत ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला होता.

यात अशोक महाजन हा सिन्नर तालुक्यातील माळेगाव एमआयडीसीतील कंपनीमध्ये प्रॉक्सी पेंटीगची काम करीत होता. तसेच १७ जुलै रोजी तो पैसे घेण्यासाठी तेथे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तपासाची चक्रे फिरवून पोलिसांनी संदिप मनोहर सोनवणे यास अटक केली. त्यास पोलीसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

१७ जुलै रोजी मयत महाजन आणि संशयित सोनवणे हे महाजन यांच्या कामाचे पैसे घेण्यासाठी सिन्नर येथे दुचाकीवर गेले होते. माळेगाव एमआयडीसी येथून १८ हजार रूपये मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा परतीचा प्रवास सुरू केला.

महोदरी घाटात संशयित सोनवणेने दुचाकी थांबविली. तसेच यापूर्वी महाजन यांना दिलेल्या ७०० रूपयांची मागणी केली. तुला आता पैसे देता येणार नाही. नंतर देतो, असे महाजन यांनी सांगितले.

मात्र, तुझ्याकडे १८ हजार रूपये असून, तु माझे ७०० रूपये का देत नाही, असा प्रश्न सोनवणेने उपस्थित केला. त्यामुळे दोघात भांडण सुरू झाले. राग अनावर झाल्याने सोनवणेने रस्त्याच्या बाजुस पडलेला एक मोठा दगड महाजन यांच्या डोक्यात मारला. गंभीर जखमी झालेल्या महाजन यांच्या खिशातील १८ हजार रूपयांची रक्कम काढून सोनवणेने घटनास्थळावरून पळ काढला.

स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने तपास करुन संशयित सोनवणे याला अटक केले. जिल्ह्याच्या पोलिस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक के.के. पाटील, सहायक पोलिस निरीक्षक अनिल वाघ, एएसआय प्रभाकर पवार, हवालदार प्रकाश चव्हाणके, पोलिस नाईक प्रितम लोखंडे, हेमंत गिलबीले, कॉन्स्टेबलल निलेश कातकडे, किरण काकड, संदिप लगड, प्रदिप बहिरम यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com