नाशिक | प्रतिनिधी

शहरातील मध्यवर्ती बस स्थानक (सीबीएस ) जवळील एका हॉटेलच्या खोलीत बुधवारी (दि.१३) सायंकाळी एका २१ वर्षीय युवतीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी युवतीसोबत असलेल्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे....

तन्मय प्रवीण धानवा (२१, रा.मासवन, कोळीपाडा, पालघर) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताच्या नाव आहे. तर अर्चना सुरेश भोईर (२०,रा. कल्लाले मान, बोईसर) असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे.

हे प्रेमी युगुल नाशिक येथे मुक्कामी आले होते. दरम्यान, बुधवारी संध्याकाळी पाच वाजता तन्मय व अर्चनाचे आई,वडीलांसह अन्य नातेवाईक हॉटेलमध्ये अचानकपणे आल्याने त्यांची भांडणे झाली.

यावेळी हॉटेलचे व्यवस्थापक व अन्य कामगारांनी धाव घेतली. यावेळी खोलीतील पलंगावर अर्चना मृतावस्थेत आढळून आली व तन्मय येथील एका कोपऱ्यात बसलेला होता.

याबाबत व्यवस्थापकाने पोलिसांना माहिती दिली. काही वेळेतच सरकारवाडा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी अर्चनाला तपासून बघितले असता ती मयत झाल्याची खात्री पटली. यावेळी पोलिसांनी तिच्यासोबत थांबलेल्या तन्मयला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, पोलिसांनी प्रथमदर्शनी अर्चनाचा तोंड दाबल्यामुळे मृत्यु झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. प्रियकर तन्मय यास पोलिसांनी अटक केली आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.