मालेगाव | प्रतिनिधी

शासनाच्या धोरणानुसार मालेगाव शहरातील भुईकोट किल्ल्याच्या परिसरातील अतिक्रमणासंदर्भात लोकआयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली योग्य निर्णय घेण्यात येईल असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आज सांगितले...

लोकआयुक्तांकडे दाखल झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने मालेगांव शहरातील भुईकोट किल्ल्याची स्थळ पाहणी केल्यानंतर महानगरपालिकेत आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी मांढरे बोलत होते.

यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी, महानगरपालिकेचे आयुक्त दिपक कासार, उपविभागीय अधिकारी डॉ.विजयानंद शर्मा, पोलीस उपअधिक्षक प्रविण जाधव, उपायुक्त नितीन कापडणीस, तहसिलदार चंद्रजित राजपूत, डॉ.हितेश महाले, डॉ.सपना ठाकरे यांच्यासह तक्रारदार रामदास बोरसे, महसूल, महानगरपालिका व भुमीअभिलेख विभागातील प्रमुख उपस्थित होते.

किल्ला स्थळाची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी श्री.मांढरे यांनी महानगरपालिकेत आयुक्तांच्या दालनात सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली. लोकआयुक्तांकडे दाखल तक्रारीच्या अनुषंगाने सर्व संबंधितांना तपशिलासह पुरावे सादर करण्याचे निर्देश देतांना या संदर्भातील शासन निर्देश तसेच शासनाचे धोरण तपासून पाहण्याचे निर्देश त्यांनी दिले.

किल्ला परिसराबरोबरच संपूर्ण शहरातील अतिक्रमणाचा तपशिल, कर भरणा केल्याचे पुरावे इत्यादी माहिती सादर करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. त्याचबरोबर किल्ल्याचे संवर्धन करण्यासह किल्ला परिसराचे सुयोग्य नियोजन तयार करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.

जुन्या वास्तुंचे जतन गरजेचे

शहरातील जुन्या वास्तुंचे जतन करणे गरजेचे असल्याचे सांगतांना जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, नाशिक जिल्हा निर्मीतीचे 151 वे वर्ष साजरे करतांना हा कार्यक्रम संपूर्ण नाशिक जिल्ह्याचा असून यामध्ये मालेगाव येथील जुने संदर्भ प्रकाशझोतात आणणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. याकरिता सर्व यंत्रणांनी कामाला लागून संदर्भासहीत अहवाल सादर करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.