नाशिकरोड | प्रतिनिधी

वार्षिक वीस कोटींपेक्षा जास्त महसूल देणारे नाशिक शहरातील रेल्वे रिझर्व्हेशन ऑफिस आजपासून (दि 1) बंद करण्याचा रेल्वेचा सध्या तरी विचार नाही. मात्र, महापालिकेने ऑफिसच्या भाड्यात वाढ केली किंवा सूट दिली नाही तर ऑफिस बंद करावा लागेल, अशी माहिती रेल्वेच्या भुसावळ विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक विवेककुमार गुप्ता यांनी दिली.

भुसावळ विभागातील पत्रकारांशी ऑनलाईन संवाद साधताना विवेककुमार म्हणाले की, नाशिक शहरातील रिझर्व्हेशन ऑफिस दरवर्षी लाखोंचा तोटा सहन करुन प्रवाशांच्या सोयीसाठी सुरु ठेवले आहे. शहरात रिझर्व्हेशन सुविधामुळे प्रवाशांना नाशिकरोडला पैसा, वेळ, श्रम खर्ची घालून जावे लागत नाही. ऑफिसचे भाडे पाच ते सहा पट वाढविण्याचा महापालिकेचा विचार आहे. त्यांनी वाढ करु नये, आम्हीही कार्यालय बंद करणार नाही.

विवेककुमार गुप्ता म्हणाले की, नेहमीच्या प्रवासी गाड्या बंद असल्यामुळे रेल्वेला कोट्यावधींचा तोटा झाला आहे. भुसावळ रेल्वे विभागाला गेल्या वर्षी सहाशे कोटींचा प्रवासी महसूल मिळाला होता. यंदा 125 कोटीचा महसूल मिळाला.

नाशिकरोडहून ऑटोमोबाईलच्या 150 मालगाड्या भरुन पाठविल्यामुळे रेल्वेचा तोटा भरुन निघत आहे. गेल्या वर्षी ऑटोमोबाईलच्या 50 गाड्या गेल्या होत्या. नाशिकमधून या वर्षी कांद्याच्या 220 मालगाड्या देशभरात पाठविण्यात आल्या.

यातील 65 मालगाड्या बांगलादेशला पाठवल्या. त्यामुळे रेल्वेला जादा महसूल व शेतक-यांना चांगला दाम मिळाला. देशातील पहिली किसान ट्रेन 7 आगस्ट 2020 रोजी देवळाली कॅम्पहून सुरु झाली. देशात आता सर्वत्र किसान रेल सुरु असून शेतक-यांना 15 टक्के अनुदान त्यासाठी मिळते.

जळगाव भागातून केळी जानेवारी ते मार्च दरम्यान केळीच्या 16 तर कापसाच्या 9 मिनी मालगाड्या देशभरातून पाठविल्या. सिमेंट, खत आदींच्या वाहतुकीमुळे गेल्यावर्षी 500 कोटी महसूल मिळाला होता. यंदा 600 कोटी महसूल मिळाला. करोना काळातही मालवाहतूकीत 13.6 टक्के आणि महसूलात वीस टक्के वाढ झाली.

सध्या स्पेशल ट्रेन सुरु आहेत. त्यामुळे अंध, अपंग, पत्रकार आदींना रेल्वे भाड्यात सवलत देता येत नाही. नेहमीच्या रेल्वेगाड्या सुरु झाल्यावर सवलत पुन्हा सुरु केली जाईल, असे सांगून विवेककुमार म्हणाले की, रेल्वे कर्मचा-यांनाही करोनाचा संसर्ग होत आहे.

त्यामुळे विभागात दररोज चारशे कर्मचा-यांना लस दिली जात आहे. पंधरा दिवसात सर्व सोळा हजार कर्मचारी-अधिका-यांना कोविड लस देण्यात येईल. राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाने मदत केली तर रेल्वे स्थानकांत प्रवाशांची करोना टेस्ट व इतर तपासणी सुरु करता येईल. स्थानिक प्रशासनाला याबाबत पत्र दिले आहे.

भुसावळ विभागात लोकलप्रमाणे मेमो ट्रेन सुरु होणार होत्या. करोनामुळे त्या स्थगित केल्या आहेत. प्रवाशांशिवाय अन्य लोकांनी स्थानकात येऊ नये म्हणूनच प्लॅटफार्म तिकीट दहावरुन पन्नास रुपये केले आहे.

करोना नियंत्रणात आल्यावर ते पुन्हा कमी होईल. रेल्वे प्रवासातील अनाधिकृत विक्रेत्यांमुळे करोनाचा धोका वाढतो. अशा विक्रेत्यांवर कारवाईची मोहिम सुरु करण्यात येईल.