...म्हणून या श्वानाचे नाव ठेवले 'गुगल'

आतापर्यंत ७० गुन्ह्यांत मार्गदर्शन; ८-१० गुन्हे उलगडण्यास झालीये मदत
...म्हणून या श्वानाचे नाव ठेवले 'गुगल'

नाशिक | प्रतिनिधी

एखादी गोष्ट आपल्याला हवी असल्यास ती शोधण्यासाठी जसे आपले हात पटकन गुगल सर्च इंजिनवर जातात. तसेच गुन्हे शोधण्यासाठी नाशिक पोलिसांच्या ताफ्यातही एक 'गुगल' आहे. या 'गुगल'चा नुकताच वाढदिवस संपन्न झाला. डोक्यावर टोपी, केक, अंडी असा पाहुणचार या गुगलच्या वाढदिवसाला होता. गुगल दुसरं तिसरं कुणी नसून नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या श्वान पथकातील एक श्वानाचे नाव आहे.

अनेकांना प्रश्न पडतो की एवढे अफलातून नाव कसे ठेवले असेल. कुणी ठेवले असेल? याबाबत जेव्हा या श्वानाच्या हस्ताकाशी देशदूतने संवाद साधला तेव्हा असे समोर आले की, तत्कालीन माजी पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांनी डॉबरमॅन जातीच्या श्वानाची खरेदी केली होती.

याचवेळी सिंघल यांनी त्याच्यातील सुप्त गुण हेरून 'गुगल' असे त्याचे नाव ठेवले होते. गुगल श्वान पथकाच्या कार्यालयाबाहेर कुणाला फिरकू देत नाही. तसेच आपल्या कर्तव्यात कधी कसूर करत नाही.

त्याच्या सभोवताली माशी जरी फिरत असली तरी तिला तो जवळ येऊ देत नाही. एका बंद घरात सोफ्याखाली लपून बसलेल्या गुन्हेगाराला त्याने घरात शिरून शोधून काढले होते. गुगल एवढ्या वरच थांबत नाही तर नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेत नाशिकला प्रथमच कास्यपदक पटकावून गौरवाचे स्थानदेखील या गुगलने प्राप्त करून दिले आहे.

गुगल ४५ दिवसांचा असताना हैदराबाद येथील शेख बिल्डर याच्याकडून खरेदी करण्यात आला होता. त्यानंतर तो नाशिक पोलिसांच्या श्वानपथकात दाखल झाला. सुरुवातीला सहा महिने 'संगोपन प्रशिक्षण झाले. त्यानंतर त्याला नऊ महिन्यांसाठी चंदीगढ येथील भानु' सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणानतर तो पोलीस ताफ्यात गुन्हे शोध पथकात दाखल झाला.

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत त्याने कास्य पदक पटकावून नाशिकला गौरव प्राप्त करून दिला. नाशिकच्या पोलीस श्वान पथकातील असा तो पहिला श्वान ठरला आहे.

गुगल' ने आतापर्यंत ७० गुन्ह्यामध्ये सहभाग घेतला आहे. २० गुन्हात त्याची मोठी मदत झाली आहे. सात ते आठ गुन्हे उघडकीस आणण्यास तो यशस्वी ठरला आहे.

गुन्हे शोध पथकात उपनगर, मुंबई नाका परिसरातील घरफोडीत शोध लावण्यास गुगलने मोठी कामगिरी बजावल्याने तो चर्चेत आला होता.

गुगलची संपूर्ण जबाबदारी श्वान पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बी.पी. मारे, डॉग हँडलर पोलीस हवालदार गणेश कोडे व पोलीस हवालदार अरुण चव्हाण यांच्यावर आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com