सिन्नर : महिलेवर अत्याचार, आयशर चालक फरार

सिन्नर-नाशिक महामार्गावर घडली घटना
सिन्नर : महिलेवर अत्याचार, आयशर चालक फरार

सिन्नर । प्रतिनिधी

सिन्नर-शिर्डी महामार्गावरील पाथरे येथून 5 वर्षीय मुलासह सिन्नरला निघालेल्या 35 वर्षीय महिलेवर आयशर चालकाने अतिप्रसंग केल्याची घटना बुधवारी (दि.12) दुपारी 3 वाजेच्या दरम्यान घडली.

सदर महिला आपल्या मुलासह दुपारी 2.30 च्या दरम्यान महामार्गावर बसची वाट पहात थांबली असता, कोपरगाव बाजूने तपकिरी रंगाची आयशर येऊन थांबली.

चालकाने सिन्नरला घेऊन जाण्याच्या बहाण्याने महिलेसह मुलाला चालकाच्या केबीनमध्ये बसून घेतले. नवखी असलेल्या महिलेला सिन्नर आले तरी समजले नाही.

मोहदरी घाट उतरुन आयशर पूढे जाऊ लागल्यानंतर सदर महिलेला सिन्नर मागे राहिल्याचा अंदाज आला. त्यामुळे तिने आयशर थांबवून मला सिन्नरला पोहचवा अशी चालकाला विनंती केली. त्यावेळी चिंचोली फाट्याच्या अलिकडे हिरानंदानी पार्कजवळ आयशर रस्त्याच्या कडेला थांबवला व तेथेच सदर महिलेवर अतिप्रसंग केला.

त्यानंतर सदर महिलेला चालकाने आयशरमध्येच सिन्नर बसस्थानकाजवळ सोडून तो निघून गेला. या घटनेने घाबरलेल्या महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाऊन आपल्यावरील आपबीती सांगितली.

तपकिरी रंगाची आयशर व औरंगाबादहून नाशिकला माल घेऊन जात असल्याचे चालकाने सांगितले, यापलीकडे महिला काही सांगू शकली नाही.

सदर महिलेची तक्रार पोलीस ठाण्याने नोंदवून घेतली असून आज (दि.13) सायंकाळी उशीरा या महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. पोलीस उपअधिक्षक माधव रेड्डी यांनी तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाऊन सदर महिलेची भेट घेतली.

या महिलेच्या तक्रारीनंतर पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन घटनेशी संबंधीत काही वस्तू जप्त केल्याचे समजते. पोलीसांनी आयशर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक रहाटे करीत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com