कडक लॉकडाऊन काळात बाजार समितीचे ५० लाखांचे नुकसान

१२ दिवसात कोट्यवधींची उलाढाल ठप्प
कडक लॉकडाऊन काळात बाजार समितीचे ५० लाखांचे नुकसान
नाशिक बाजार समिती

पंचवटी | वार्ताहर

कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी ब्रेक द चैन अंतर्गत कडक लॉक डाऊन करण्यात आल्याने नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या देखील बंद ठेवल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये होणारी दररोजची साडेतीन ते चार कोटींची उलाढाल ठप्प झाल्याने बारा दिवसांच्या बंद काळात बाजार समितीला जवळपास पन्नास लाख रुपयांच्या उत्पन्नवर पाणी सोडावे लागले असल्याची माहिती सचिव अरुण काळे यांनी दिली...

अजूनही बाजार समितीमध्ये आवक कमी होत असल्याने उलाढाल कमी प्रमाणात होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

नाशिक जिल्ह्यात गेल्या आठवड्यांपर्यंत कोरोना बाधित रुग्णसंख्या हजारोंच्या घरात जात असल्याने नाशिकमध्ये रुग्णांना रेमडीसीवीर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड मिळणे दुरापास्त झाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या होत्या.

यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी बुधवार (दि १२) रोजी ते रविवार (दि २३) रोजी पर्यंत कडक लॉक डाऊनचा निर्णय घेतला. याकाळात बाजार समित्यासमित्यांचाही समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बारा दिवस बंद ठेवण्यात आल्या होत्या.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळभाज्या, पालेभाज्या, कांदा, बटाटा, फळे आदींच्या लिलावातून दररोज साडेतीन ते चार कोटींची उलाढाल होत असते.

यातून बाजार समितीला बाजार फीच्या माध्यमातून एक टक्का महसूल मिळत असल्याने बाजार समितीचे देखील दररोजचे साडेतीन ते चार लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

बारा दिवस बाजार समिती बंद असल्याने जवळपास पन्नास कोटींची उलाढाल ठप्प होऊन बाजार समितीला पन्नास लाखांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे.

सोमवार (दि २३) पासून बाजार समितीमध्ये भाजीपाला आणि फळभाज्यांचे लिलाव पूर्ववत सुरु करण्यात आले आहेत. अनेक व्यापारी बाजार समिती बंदच्या काळात शेतकऱ्यांच्या खळ्यावर जाऊन शेतमाल खरेदी करत आहेत. त्यामुळे अजूनही तीच पद्धत सुरु असल्याने बाजार समितीला त्याचाही फटका बसत असून दोन दिवसांपासून भाजीपाल्याची आवक बाजार समितीमध्ये कमी होत आहे.

बाजार समितीमध्ये बारा दिवसांच्या बंदमुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली असून बाजार समितीचा पन्नास लाखांचा महसूल बुडाला आहे. बाजार समितीचे व्यवहार पूर्ववत झाले असले तरी शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला मोठ्या प्रमाणात आणत नसल्याने दोन दिवसांपासून त्याचाही फटका बाजार समितीला बसत आहे. शेतकऱ्यांनी कोरोना संसर्गाचा धसका घेतल्याचे निदर्शनास येत असून लवकरच आवक वाढण्याची शक्यता आहे.

अरुण काळे, सचिव, नाकृऊबा समिती

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com