नाशिक कृउबा समिती निवडणूक : सहकारी संस्थांच्या प्रारूप मतदार यादीवरील हरकती फेटाळल्या

नाशिक कृउबा समिती निवडणूक : सहकारी संस्थांच्या प्रारूप मतदार यादीवरील हरकती फेटाळल्या

पंचवटी | प्रतिनिधी | Panchavati

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची (Nashik Agricultural Produce Market Committee Elections) प्रक्रिया सुरू असून, यासाठी जाहीर झालेल्या सहकारी संस्थांच्या प्रारूप मतदार यादीवर नोंदविण्यात आलेल्या हरकती जिल्हा उपनिबंधकांनी फेटाळल्या आहेत...

निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक यांनी हरकतीत नमूद संचालक हे निवडणुकीस पात्र सभासद असल्याने त्यांची नावे मतदार यादीत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीच्या दृष्टीने गेल्या महिन्यात १४ नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्या प्रारूप मतदार यादीवर २३ नोव्हेंबर ते २ डिसेंबरपर्यंत आक्षेप व हरकती लेखी स्वरूपात दाखल करून घेण्यात आल्या होत्या.

यात पिंपळगाव खांब येथील बाळू संतू बोराडे, रामभाऊ भागूजी जाधव, विल्होळी सारुळ येथील गणपत शंकर नवले, संजय संतू घेळ यांनी माजी खासदार तथा बाजार समितीचे माजी सभापती देविदास पिंगळे यांच्यासह चंद्रकला पिंगळे, गोकुळ पिंगळे, माजी संचालक दिलीप थेटे व अलका थेटे, सचिन थेटे अशा जवळपास २७६ सहकारी संस्थांच्या संचालक सभासदांच्या दुबार नावांसंदर्भात हरकती घेतल्या होत्या. त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी नुकताच निर्णय जाहीर केला आहे.

सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ३५ अन्वये कारवाई करण्यात आलेली नसल्याने हरकतीत नमूद संचालक सभासद निवडणुकीस पात्र असल्याने त्यांची नावे मतदार यादीत कायम ठेवण्यात यावी, असा अभिप्राय त्यांनी आदेशात दिला आहे. माजी सभापतींसह संचालक य त्यांचे कुटुंबीय यांची नावे हरकतीत असल्यामुळे सहकार क्षेत्राचे याकडे लक्ष लागून होते.

चुंभळे गटाचा 'नेम' चुकला

संबंधित हरकतीवरून बाजार समितीचे माजी सभापती देविदास पिंगळे आणि शिवाजी चुंभळे यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पिंगळे आणि चुंभळे गटातील वाद नवा नाही. जसजशी निवडणूक जवळ येईल तसा या दोहोंमधील संघर्ष आणखी वाढत जातो, हा आजवरचा इतिहास आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या जातात.

जोडीला 'कागदीबाण'ही सोडले जातात. बाजार समितीची निवडणूक होईपर्यंत दोन्ही गटांकडून आणखी किती 'कागदीबाण' सोडले जातात आणि यात कोण घायाळ होते, हे येणाऱ्या काळात दिसेलच. परंतु, ह्यावेळी समर्थकांमार्फत चुंभळे गटाने सोडलेल्या बाणांचा नेम मात्र चुकला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com