
नाशिक । प्रतिनिधी Nashik
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक( Nashik APMC Elections) 15 मार्च 2023 पर्यंत लांबणीवर टाकण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या निर्णयामुळे बाजार समितीची निवडणूक तीन महिने लांबणीवर पडली आहे. मात्र, याबाबतचे सहकार प्राधिकरणाकडून अधिकृतपणे पत्र प्राप्त झालेले नाही. दरम्यान, बाजार समिती प्रशासनाकडून यास दुजोरा देण्यात आला आहे.
नाशिक बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. 29 जानेवारीला मतदान होणार होते. दरम्यान, जिल्ह्यातील 196 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू होती. यातील नाशिक बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील तीन तालुक्यांतील 12 ग्रामपंचायतींचा समावेश होता.याशिवाय विनायक माळेकर, बहिरू मुळाणे, युवराज कोठुळे यांनी पेठमधील 71, नाशिकमधील 18 तर, त्र्यंबकेश्वरमधील 58 अशा एकूण 147 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊन देखील त्या ग्रामपंचायत सदस्यांची नावे मतदार यादीत नसल्याचे निदर्शनास आणून दिले होते.
याबाबत सदानंद नवले यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.त्यावर सुनावणी झाली.यामध्ये नाशिक बाजार समितीची निवडणूक 15 मार्चनंतर घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशामुळे या बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील 147 ग्रामपंचायतींमधील सुमारे एक ते दीड हजारांपेक्षा जास्त नवनिर्वाचित सदस्यांना बाजार समितीच्या मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचा अधिकार प्राप्त होणार आहे.