हक्कासाठी नांदुरी, गडवासीय एकवटले

विश्वस्त पदासाठी स्थानिकांना डावलले
हक्कासाठी नांदुरी, गडवासीय एकवटले

सप्तशृंगी गड। Saptshrungi Gadh (प्रतिनिधी)

साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे शक्तिपीठ असलेल्या आदिशक्ती श्री सप्तशृंगी निवासिनी देवीच्या संस्थानच्या विश्वस्तपदी स्थानिकांना डावलून इतर व्यक्तींची नियुक्ती करण्यात आल्याने श्री क्षेत्र सप्तशृंगीगड नांदुरी गावातील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या असून विश्वस्त नेमणुकीच्या प्रक्रियेबाबत व स्थानिकांचा समावेश व्हावा, यासाठी हायकोर्टात याचिका दाखल होण्याची शक्यता आहे.

श्री सप्तशृंगी निवासनी देवी संस्थानच्या विश्वस्त नेमणुकीची प्रक्रिया ही जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्यामार्फत निवड समिती करते. यामुळे नागरिकांना न्यायाल्याच्या धाक दाखवून कित्येक वर्षांपासून स्थानिकांना डावलले जात आहे.

सप्तशृंगी संस्थान व गाव या ठिकाणी होणारे उत्सव, सण, रूढी परंपरा समस्या यांची सर्वात जास्त माहिती ही स्थानिकांना असते. तरीही कित्येक वर्षांपासून मूळ रहिवास्यांना डावलून वातानुकूलित कार्यालयात बसणारे व फक्त सण, उत्सवात फोटो काढायला येणार्‍या अस्थानिकांना विश्वस्त मंडळात स्थान देणे म्हणजे कायद्याचा बडगा दाखवून मनमानी करणे अशी तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थानीं दिल्या आहेत.

महाराष्ट्रातील प्राचीन व महत्त्वपूर्ण देवस्थान असलेल्या ठिकाणी स्थानिकांना विश्वासात घेऊन न्यायालयाच्या हस्तक्षेपानेे विश्वस्त नियुक्ती केले आहेत. मात्र फक्त यास सप्तशृंगी देवस्थान ट्रस्ट अपवाद आहे.

संस्थानचे विश्वस्त व स्थानिक ग्रामपालिका यांचे समन्वयातून विविध विकास व्हावा, यासाठी अपेक्षा असतांना आजपर्यंत संस्थानचे विश्वस्त यांच्याकडून विकास कामाबाबत दुजाभाव नेहमी दिसून आला आहे.

ब वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळालेल्या सप्तशृंगीगड येथे विश्वस्ताच्या दुर्लक्षामुळे विविध विकासकामे मार्गी लागू शकलेले नाही. नामदार छगन भुजबळ यांनी महत्त्वाकाक्षी फ्यूनिक्युलर ट्रॉली प्रकल्प कार्यान्वीत केली. याव्यतिरिक्त कोणतेही मोठे काम झालेले नाही.

स्थानिक,नागरिक ग्रामपालिका व संस्थान यात समन्वय नसल्याने विकास खोळंबला आहे. यासाठी संस्थानमध्ये स्थानिकांचा समावेश असणे गरजेचे आहे. जेणेकरून सर्वांच्या प्रयत्नातून वणी मार्गे घाट रस्ता, शितखडा ते मार्कण्ड ऋषी रोपवे आदीसारखे कामे मार्गी लागून पर्यटनास चालना मिळून येथील व्यवसायिकांना रोजगाराची संधी निर्माण होतीलच पण संस्थानच्या उत्पन्नातसुद्धा भर पडेल. यावेळी सप्तशृंगी गडावरचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

सप्तशृंगी गडावर स्थानिक लोकांना जर संस्था विश्वस्त पदासाठी दुजाभाव करत असेल तर हे ग्रामस्थांसाठी अपमानास्पदक बाब आहे.

अजय दुबे, सप्तशृंगीगड

जर त्र्यंबकेश्वर मंदिरात स्थानिक विश्वस्त घेत असतात आणि बाहेरील अस्थानिक विश्वस्त होत नाही. मग सप्तशृंगी गडावर दुजाभाव का, यासाठी मी नांदुरी गावातील स्थानिक असून निषेध व्यक्त करत आहे.

सोनाली जाधव, नांदुरी

आतापर्यंत विश्वस्त पदासाठी संस्था ग्रामस्थांचा विश्वासघात करत आली आहे, यासाठी कायद्याचा धाक दाखवून स्थानिकांना वंचित ठेवले जाते.

राजेश गवळी, माजी उपसरपंच

सप्तशृंगी गडावर जे विश्वस्त झाले आहे. त्यांना गडावरची आर्थिक परिस्थिती माहीत आहे का? व ग्रामस्थांचा अधिकार डावल्याने आम्ही जाहीर निषेध करत आहोत.

संदीप बेनके, समाजसेवक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com