नंदिनी नदी परिसरावर आता सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर; स्मार्ट सिटीची अंतिम मंजुरी

नंदिनी नदी परिसरावर आता सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर; स्मार्ट सिटीची अंतिम मंजुरी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नंदिनी नदीचे (nandini river) संरक्षण व्हावे आणि प्रदूषण (Pollution) रोखले जावे, यासाठी या नदीच्या दोन्ही किनारी उंटवाडी ते गोविंदनगरपर्यंत दहा ठिकाणी एकूण २६ कॅमेरे (camera) बसविण्याचे स्मार्ट सिटीने (smart city) निश्चित केले आहे.

याबाबतचे पत्र सत्कार्य फाउंडेशनला (Satakarya Foundation) प्राप्त झाले असल्याची माहिती अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड यांनी दिली. गोदावरीची (godavari) उपनदी असलेल्या नंदिनी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात घाण व कचरा (garbage) टाकून प्रदूषण केले जाते, वाळू उपसाही मोठ्या प्रमाणात केला जातो. मद्यपी, हे नदीपात्रात येवून बसतात, लपण्यासाठी गुन्हेगारही (criminal) येथे आश्रय घेतात.

नंदिनीमुळे गोदावरीचेही प्रदूषण वाढते. नागरिकांना गुन्हेगारीचा त्रास होतोच; परंतु त्यांचे आरोग्यही (health) धोक्यात येते. प्रदूषण रोखण्याला मदत व्हावी, नदी व परिसरातील नागरिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी नदीच्या दोन्ही किनारी उंटवाडी ते गोविंदनगरपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Camera) बसविण्यात यावे, अशी मागणी सत्कार्य फाउंडेशनने बाबासाहेब गायकवाड, चारुशीला गायकवाड देशमुख यांच्या पुढाकाराने महापालिका आयुक्त आणि स्मार्ट सिटीकडे डिसेंबर २०२१ मध्ये केली होती.

याबाबत गायकवाड दाम्पत्याने सतत पाठपुरावा केला. महापालिका आयुक्तांनी या विषयाला (१६ मार्च २०२२) मंजुरी देवून त्याबाबतचे पत्र व नकाशे स्मार्ट सिटीला दिले. स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या (Smart City Board of Directors) २३ व्या बैठकीत या विषयाला मंजुरी देण्यात आली. इतिवृत्तही मंजूर करण्यात आले. निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर संबंधित ठेकेदाराला वर्कऑर्डर देण्यात आली आहे.

गोविंदनगर ते उंटवाडीपर्यंत दोन्ही किनारी एकूण दहा ठिकाणी २६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निश्चित झाले आहे. याबाबतचा स्थळ पाहणी तांत्रिक अहवाल स्मार्टसिटीला कॉन्ट्रॅक्टरने दिला आहे. या प्रकल्पाची ही माहिती देणारे सर्व पत्र स्मार्ट सिटीकडून सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड यांना प्राप्त झाले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com