नांदगाव तालुका वार्तापत्र: धरणे चार तरीही पाण्यासाठी जनता बेजार!

नांदगाव तालुका वार्तापत्र: धरणे चार तरीही पाण्यासाठी जनता बेजार!

नांदगाव | संजय मोरे | Nandgaon

यावर्षी पेरले जे मोती, त्याची झाली माती...नशीबात आता फक्त साडेसाती...चारा-पाण्याचीही सोय नाही यंदा, भाकरी शोधतो जगाचा पोशिंदा...अशी नांदगाव तालुक्याची (nandgaon) दयनीय अवस्था झाली आहे.

नांदगाव तालुका (nandgaon taluka) भौगोलिकदृष्ट्या एका बाजूला असलेला आयसोलेटेड तालुका आहे. नाशिक जिल्ह्याच्या (nashik district) पूर्व टोकाला औरंगाबाद जिल्ह्याच्या (Aurangabad district) सीमावर्ती भागात असल्याने भौगोलिकदृष्ट्याही या तालुक्यावर निसर्गाने अन्याय केला आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकर्‍यांनी आत्महत्या (Farmers commit suicide) केलेला तसेच पाचवी पुजलेला दुष्काळी तालुका, अशी नांदगाव तालुक्याची ओळख आहे.

धरण उशाला आणि कोरड घशाला या म्हणीचा प्रत्यय येणारी स्थिती नांदगावची आहे. वास्तविक नांदगाव तालुक्यात लहान-मोठी चार धरणे आहेत. नांदगाव नगरपरिषदेचे (nagar parishad) हक्काचे धरण म्हणजे दहेगांव धरण (Dahegaon Dam), माणिकपुंज धरण (Manikpunj Dam) नांदगाव शहरासाठी पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित आहे. तसेच माणिकपुंज, कासारी, जळगाव बु. व खु., पोही, कसाबखेडा, चांदोरा, न्यायडोंगरीसह चाळीसगाव तालुक्यातील गावांना या धरणाचा सिंचनासाठी उपयोग होतो.

नाग्या-साक्या धरण हे चांदवड तालुक्यातील (chandwad taluka) पाणीपुरवठा योजनेसाठी (Water supply scheme) आरक्षित आहे. या धरणाचा सिंचनासाठी उपयोग होतो. गिरणा धरण (girana dam) हे नांदगाव (nandgaon), चाळीसगाव (chalisgaon), मालेगाव (malegaon) या तालुक्यांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी आरक्षित आहे. नांदगाव तालुक्यातील धरणे इतर तालुक्यांची तहान भागवित आहेत तर नांदगाव शहर व तालुका मात्र कोरडाच राहिला आहे. नांदगाव मतदार संघातील जनतेला पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मतदार संघात राजकीय पक्षांचे राजकारण पाण्यासाठी भोवती फिरत आहे.

नांदगाव तालुक्यात पाण्यासारख्या प्रश्नावर राजकारण केले जाते. तालुक्यातून पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक स्थलांतरित झाले आहेत. नांदगाव (nandgaon), मनमाड (manmad) येथे एमआयडीसी (MIDC) नाही किंवा उत्पन्नाचे अन्य स्रोत नाहीत. येथील अर्थकारण मुख्यतः शेतीवरच अवलंबून आहे. नोकरदारांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. नांदगाव तालुक्यात बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर आहे. बेरोजगारीमुळेही तालुक्यातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे. शेती हा महत्त्वाचा उद्योग आहे.

मका, कांदा, कपाशी, बाजरी ही पिके घेतली जातात. उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात कांद्याची निर्यात होते. एकेकाळी कापूस प्रक्रिया करणार्‍या 3 गिरण्या येथे होत्या. गेल्या काही वर्षात मका पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न होत आहे. त्यावर आधारित पशुखाद्य, कोंबडीखाद्य यासारखे उद्योग यावेत, अशी मागणी आहे. नांदगाव तालुक्यात पोल्ट्रीफार्मची संख्या मोठी आहे. मका थेट पोल्ट्रीफार्मला विकावा, असे प्रयत्न सुरू आहेत.

दोन वर्षांपूर्वी नारपार (दमनगंगा) प्रकल्प योजनेचा मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्यकर्ते समाधान पाटील व अशोक परदेशी यांनी पाठपुरावा केला. या योजनेसंदर्भात नांदगाव तालुक्यात जनजागृती करण्यात आली. मनमाडजवळील अंंकाईपासून थेट नांदगाव तालुक्यात पाणी घेता येईल. त्यात 70 ते 80 टक्के भाग ओलीताखाली आणता येईल. यामुळे नांदगाव तालुका सुजलाम् सुफलाम् होईल, अशी संकल्पना मांडली होती. या योजनेच्या डिपीआरमध्ये नांदगाव तालुक्याचा समावेश झाला किंवा नाही, याबाबत साशंकता आहे. नांदगावला 2 वर्षापासून चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती टळली आहे. तालुक्यातून 70-80 टँकरची पाण्यासाठी शासन दरबारी मागणी असते. मात्र गेल्या दोन-तीन वर्षांपासून टँकरची मागणी कमी झाली आहे.

नांदगाव शहराची लोकसंख्या जवळपास 24,760 असून शहराला स्वतःच्या अर्थकरणाचे साधन नाही, तसे पाण्याचेही साधन नाही. मुळात तालुक्यात सरासरी 450 मी.मी. इतका पाऊस पडतो. जवळच असलेल्या माणिकपुंज व गिरणा धरणाच्या पाण्यावर नांदगाव शहराला अवलंबून राहावे लागते. नांदगाव तालुक्यात मध्यम आणि लघु प्रकल्पांची एकत्रित साठवण क्षमता जेमतेम दीड टीएमसी इतकी आहे.

त्यामुळे तालुक्यातील सिंचनाखालील शेतीक्षेत्र केवळ 5 टक्के इतके आहे. नांदगाव तालुक्यात बाहेरून पाणी आणल्याशिवाय पर्याय नाही, तालुक्याला पाण्याची गरज आहे. नाहीतर नांदगाव तालुक्याचा शेतकरी, व्यवसाय, अर्थकारण यावर असेच निसर्गाच्या संकटाचे सावट कायमस्वरूपी राहील. यातून शेतकरी कधीच वर येणार नाही आणि जे आतापर्यंत झाले तसेच आत्महत्येवाचून येथील शेतकर्‍यांना पर्याय उरणार नाही. त्यामुळे तालुक्याचा पाणीप्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्याची गरज आहे.

Related Stories

No stories found.