यामुळे आजपासून सेवाग्राम एक्सप्रेसचा थांबा रद्द

यामुळे आजपासून सेवाग्राम एक्सप्रेसचा थांबा रद्द

नांदगाव । Nandgoan

जानेवारीपासून प्रवाशांच्या मागणीची दखल घेत रेल्वे प्रशासनातर्फे सेवाग्राम एक्स्प्रेस सुरुवात करण्यात आली होती. मात्र सेवाग्रामला प्रवाशांचाच प्रतिसाद अत्यल्प मिळत असल्याचे कारणांमुळे अखेर दि.19 मे पासून सेवाग्रामचा थांबा रद्द करण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने पत्रकाव्दारे हे जाहीर केले आहे. नांदगाव स्थानकावरील रेल्वे गाड्यांचे थांबे पुन्हा रद्द होत असल्याने प्रवाशी हवालदिल झाले आहेत.

नांदगाव तालुक्यातील नागरिकांना मुंबई, नाशिक येथे जाण्यासाठी एकमेव सेवाग्राम एक्स्प्रेस रेल्वे गाडी रेल्वे प्रशासनाने रद्द केल्याने नांदगाव रेल्वे स्थानक हे नावापुरते रेल्वे स्थानक म्हणून ओळख राहणार असल्याची संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांतर्फे व्यक्त करण्यात आली आहे. रेल्वे विभाग हा केद्र सरकारच्या अखत्यारित असून रेल्वे गाड्यांचे थांबे पुर्ववत सुरू करण्याबाबत खा.डॉ. भारती पवार यांनी तातडीने लक्ष घालत प्रयत्न करावेत, अशी मागणी प्रवाशी संघटनांतर्फे करण्यात आली आहे.

नागपूर-मुंबई सेवाग्राम सुपर फास्ट एक्सप्रेसचा नांदगांव रेल्वे स्टेशनवरील थांबा रद्द करण्यात आला आहे. प्रवाशी गाड्यांचा नांदगांव येथील थांबा रद्द करण्यात येवू नयेत. याबाबत आ. सुहास कांदे यांनी नांदगांव रेल्वे स्टेशनचे स्टेशन प्रबंधक यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. सद्यस्थितीत करोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे इतर प्रवाशी वाहतूक बंद असुन प्रवाशांना रेल्वे हाच एकमेव पर्याय उपलब्ध आहे.

परंतु नागपूर-मुंबई सेवाग्राम सुपर फास्ट एक्सप्रेस हबीबगंज लोकमान्य टिळक टर्मिनन्स सुपर फास्ट विकली एक्सप्रेस या दोन गाड्यांचा थांबा रद्द करण्यात आल्यामुळे नांदगांव तालुक्यातील जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सदर गाड्यांचा थांबा रद्द करून रेल्वे प्रशासनाने एक प्रकारे नांदगांव तालुक्यातील जनतेवर अन्याय केला असल्याचे आ. कांदे यांनी पत्रात म्हटले आहे.

नांदगाव रेल्वे स्थानकावर एकमेव थांबणारी सेवाग्राम एक्स्प्रेस रेल्वे गाडी रद्द करण्यात आल्याने रेल्वे प्रशासनाने नांदगावकरांसाठी रेल्वे स्थानकावर पर्यायी रेल्वे गाडी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आ. कांदे यांनी निवेदनाच्या शेवटी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com