नांदगावला पुन्हा झोडपले; शाकंबरी, लेंडी नदीला पूर

नांदगावला पुन्हा झोडपले; शाकंबरी, लेंडी नदीला पूर

नांदगाव | प्रतिनिधी | Nandgoan

नांदगाव शहरात दुपारी बारा वाजेनंतर विजांच्या कडकडाटात सुरु झालेल्या पावसामुळे शाकंबरी (Shakambari River) व लेंडी नदीला (Lendi River) पूर आल्याने नागरिकांनी गेल्या आठ तारखेला आलेल्या महापुराचा (Flood) धसका घेत दुकानदारांची दुकाने आवरण्याची एकच धांदल उडाली...

नांदगावसह तालुक्यात मुसळधार पावसाने झोडपून काढले. तब्बल दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचे पुन्हा पुनरागमन झाले.

हवामान खात्याने (IMD) उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तविला होता त्यानुसार आज सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दुपारी बारा वाजेनंतर विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस (Heavy Rain) सुरू झाला.

सुमारे तासभर पावसात लेंडी नदी व शाकांबरी नदीसह नदी, नाले तुडुंब भरून वाहू लागले होते. पूर्णपणे जनजीवन विस्कळीत झाले होते. बाजारपेठेत आलेल्या नागरिकांची तारांबळ उडालेली दिसून आली.

गेल्या आठ तारखेला आलेल्या महापुरामुळे नागरिकांनी पावसाचा चांगलाच धसका घेतलेला दिसून आला. पावसाला सुरूवात होताच काही वेळानंतर लेंडी नदीच्या पाण्याचा पातळी वाढू लागली काही वेळातच लेंडी नदीवरील बाजार समिती जवळील पूल, गांधीनगरला जोडणारा पूल पाण्याखाली गेला.

यामुळे भाजीविक्रेत्यांची एकच धांदल उडाल्याचे दिसून आले. आपापली दुकाने करण्याच्या नादात काही जणांचा भाजीपालादेखील वाहून गेला. बाजारात आलेल्या नागरिकांनीदेखील पावसाचा धसका घेत उलट्या पावली आपले घर गाठण्यासाठी धावपळ सुरू केली.

दरम्यान, नांदगाव नगरपालिकेच्या वतीने (Nandgaon Municipality) ध्वनीक्षेपकाचा माध्यमातून नदीच्या कडेला राहत असलेल्या नागरिकांना इशारा देण्यास सुरुवात करण्यात आली. दोन्ही नद्यांच्या उगमावर मुसळधार पाऊस होत असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com