नांदगावला पंचायत समितीचे कामकाज ठप्प
नाशिक

नांदगावला पंचायत समितीचे कामकाज ठप्प

ग्रामसेवक करोना बाधित

Abhay Puntambekar

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

पंचायत समितीत सेविका असलेल्या महिलेचा ग्रामसेवक पती करोना पॉझिटिव्ह निघाल्याने अधिकारी-सेवकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आरोग्य सेवा वगळता पंचायत समिती कार्यालयाचे कामकाज काल बंद ठेवण्यात आले होते. कार्यालय बंद असल्याने ग्रामीण भागातून कामकाजानिमित्त आलेल्या ग्रामस्थांचे मात्र हाल झाले.

ग्रामसेवक करोना पॉझिटिव्ह आल्याने ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या सात झाली आहे. सदर ग्रामसेवकाची पत्नी पंचायत समितीत सेविका आहे. पती पॉझिटिव्ह आल्याने त्यांचाही स्त्राव नमुना तपासणीसाठी घेण्यात आला आहे. त्यामुळे अहवाल काय येतो याकडे अधिकारी-सेवकांचे लक्ष लागले आहे. ग्रामीण भागात करोनाचे संक्रमण दिवसागणिक वाढत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे.

शेतीचा हंगाम सुरू असून चांगल्या पावसामुळे खरीप पिके चांगल्या अवस्थेत आहेत. शेतीकामासाठी मजुरांची आवश्यकता भासत आहे. अशातच ग्रामीण भागात प्रादुर्भाव वाढल्यास शेतीची कामे ठप्प होण्याची भीती शेतकर्‍यांतर्फे व्यक्त केली जात आहे. संक्रमण थांबवण्यासाठी प्रशासन-आरोग्य यंत्रणेने कडक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी शेतकर्‍यांसह ग्रामस्थांतर्फे केली जात आहे.

Deshdoot
www.deshdoot.com