नांदगाव । Nandgaon (प्रतिनिधी)

शहरातील रेल्वे गेट बंद करण्यात आल्याने असुविधेमुळे संतप्त झालेल्या जनतेने बंद व मोर्चाद्वारे आपला रोष व्यक्त करताच रेल्वे प्रशासनाने तडकाफडकी उद्घाटनापूर्वीच भुयारी मार्ग आजपासून वाहतुकीसाठी सुरू केला. मात्र विजेच्या अभावासह इतर असुविधांमुळे हा भुयारी मार्ग जनतेसाठी असून अडचण नसून खोळंबा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

रेल्वे प्रशासनाने देशभरातील 30 हजार रेल्वे गेट बंद करण्याचे ठरवले आहे. या रेल्वे गेटच्या जागी अंडरपास भुयारी मार्गाचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. रेल्वेमार्गावरील वाढत्या अपघातांची टक्केवारी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नांदगाव शहराजवळील रेल्वे फाटक बंद करून त्याच्याजवळच भुयारी मार्ग उभारला आहे.

आज तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. रेल्वे गेट बाजूला कैलासनगर, आनंदनगर, नवीन वस्ती, स्वामी विवेकानंदनगर, मल्हारवाडी, गांधीनगर, नेहरूनगर, इंद्रायणीनगर, भोलेनगर आदी नागरी लोकवस्ती आहे. यामध्ये वृद्ध, मुले, महिला व पुरुषांना या भुयारी मार्गातून येण्या-जाण्यासाठी कोणतीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली नाही.

रात्रीच्या वेळी विजेची व्यवस्था करण्यात आलेली नाही. भुयारी मार्गात अंधाराचे साम्राज्य आहे. या अंधाराचा फायदा घेण्यासाठी छोट्या-मोठ्या चोर्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

येत्या काळात भुयारी मार्गाचे अभियांत्रिकी आरेखन व त्याचा मंजूर आराखडा याबाबत चौकशी करण्यात येणार आहे. कोट्यवधी रुपये खर्ची पडूनही भुयारी मार्ग दोषपूर्ण आढळून आल्यास केलेला खर्च वाया जाण्याची शक्यता येथे चर्चिली जात आहे.

भविष्यात आरेखनातील अभियांत्रिकी दोषांमुळे हा मार्ग चौकशीच्या भोवर्यात सापडण्याची चिन्हे दिसून येत आहेि. नांदगाव पूर्व भागातील नागरिकांच्या सुविधेसाठी भविष्यात रेल्वे गेटजवळ रेेेल्वेच्या पादचारी पुलाची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी शहरवासियांतर्फे केली जात आहे.