नांदगाव : ग्रामस्थांच्या निर्धारामुळे 'कर्‍ही' गाव करोनामुक्त

नांदगाव : ग्रामस्थांच्या निर्धारामुळे 'कर्‍ही' गाव करोनामुक्त

मनमाड । प्रतिनिधी

एक म्हण आहे की, गाव करी ते राव काय करी गावाने ठरविले तर काय होऊ शकते, याचा प्रत्यय मनमाडलगत असलेल्या कर्ही गावातील ग्रामस्थांनी दाखवून दिला आहे. सुमारे दीड हजार लोकसंख्या असलेल्या या गावाने राबवलेल्या आगळ्यावेगळ्या पॅटर्नमुळे आज हे गाव संपूर्णत: करोनामुक्त झाल्याने दिलासा मिळालेल्या ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. नांदगाव तालुक्यात करोनामुक्त होणारे कर्‍ही हे गाव पहिले ठरल्याने ते तालुक्यात कौतुकाचा विषय बनले आहे.

मनमाडपासून 7 किमी अंतरावर असलेले कर्ही गाव सीमेवर कर्तव्य बजावत असताना शहीद झालेले खंडू लाहिरे या जवानामुळे ओळखले जाते. करोनाच्या पहिल्या लाटेत गाव करोनापासून बचावले होते. मात्र करोनाच्या दुसर्‍या लाटेच्या विळख्यात गाव सापडले. दोन महिन्यांपूर्वी येथे एका लग्न सोहळ्यानंतर एक व्यक्ती बाधित झाल्याचे आढळून आले. त्यानंतर बाधितांची संख्या वाढून आकडा 21 पर्यंत गेला तर 3 जणांचा करोनाने बळीदेखील घेतला होता.

अचानक आलेल्या या संकटामुळे ग्रामस्थ भयभीत झाले होते. या संकटाशी मुकाबला करण्याच्या दृष्टिकोनातून सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांनी ग्रामस्थांची तातडीने बैठक घेतली. त्यात कोणत्याही परिस्थितीत करोना आटोक्यात आणण्याचा सर्वांनी निर्धार केला. बैठकीनंतर ग्रामपंचायतीने गावात फवारणी, टेस्टिंग, तपासणी, लसीकरण यासह इतर उपाययोजना राबविण्यास प्रारंभ केला .

दुकानदारांना ठराविक वेळ देण्यात आली होती. वेळप्रसंगी भाजीपाला, दूध, किराणा यासह इतर जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्याची ग्रामपंचायतीतर्फे व्यवस्था करण्यात आली. लग्न सोहळ्यामुळे गावात करोनाची एन्ट्री झाली होती. त्यामुळे लग्न सोहळे बंद करण्यात आले, शिवाय पाहुणे मंडळींनादेखील गावात प्रवेश बंदी करण्यात आली तर गावातील लोकांनी देखील बाहेर गावी जाणे बंद केले होते. ज्यांची मळ्यात राहण्याची सोय होती ते सर्व तेथे राहण्यास गेले.

या उपाययोजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जात असल्याने नागरिकांचा एकमेकांशी येणारा संपर्क तुटला. शासन आणि ग्रामपंचायतीने लागू केलेल्या नियमांची ग्रामस्थांनी काटेकोरपणे पालन केले. आपल्या घरी पाहुणे येणार नाही तसेच गावातील इतर लोकांशी देखील आपला जवळचा संपर्क होणार नाही याची दक्षता गावातील प्रत्येक ग्रामस्थाने घेतली. नियमितपणे तपासण्या केल्या गेल्या. किरकोळ आजार असलेल्यांनी वेळीच औषधोपचार केले.

त्यामुळे संक्रमणास शंभर टक्के अटकाव होवून आमचे गाव करोनामुक्त झाले असल्याचे सरपंच दत्तू घुगे, ग्रामसेविका एस. ए. बनकर यांच्यासह इतर सदस्यांनी सांगितले. आज कर्ही गाव करोनामुक्त झाले त्यामुळे ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला आहे. नांदगाव तालुक्यात करोनामुक्त होणारे कर्ही हे गाव पहिले ठरले आहे. करोनाच्या संभाव्य तिसरी लाटेला तर आम्ही गावात येवूच देणार नाही त्याला वेशीवरच रोखू, असा निर्धार ग्रामस्थ, ग्रामपंचायतीने केला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com