नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

नांदगाव रेल्वे स्थानकावर थांबा असलेल्या गाड्यांचे थांबे काढून घेणे व रेल्वेचे फाटक पूर्वसूचना न देता बंद करणे आदी मुद्यांवरून सोमवारी (दि.४) रोजी नांदगाव बंद ठेवण्याचा निर्णय 'आम्ही नांदगावकर कृती समिती'ने घेतला आहे.

नांदगाव शहरातील व्यवहार बंद करून मोर्चा काढून रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय आम्ही नांदगावकर कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. येथील शासकीय विश्रामगृहावर शुक्रवारी (दि.१) रोजी सायंकाळी विविध पक्ष, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी यांची संयुक्त बैठक संपन्न झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

नांदगाव स्थानकावरील गाड्यांचे थांबे, रेल्वे गेटच्या मुद्द्यावरून जनतेच्या होत असलेल्या गैरसोय बाबत उपस्थितांमध्ये तीव्र भावना होत्या. रेल्वे विभागाच्या वतीने नांदगाव रेल्वे स्थानकाबाबत दुटप्पी भूमिका घेत असून नांदगाव शहरावर अन्याय केला जात असल्याने उपस्थितांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

करोना नांदगाव स्थानकावरच मुक्कामाला आला आहे काय? त्यामुळे येथील थांबे रद्द करण्यात आले आहे. येथील येथील रेल्वे स्थानकावर केवळ कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेसला थांबा असून इतर कोणत्याही गाड्या या ठिकाणी थांबत नाहीत त्यामुळे तालुक्यातील जनतेला मुंबई-नाशिक,पुणे आदी ठिकाणी जाण्यासाठी त्याचप्रमाणे सैन्य दलात असलेले तालुक्यातील जवानांना आपल्या गावी येण्यासाठी आणि कर्तव्यावर जाण्यासाठी नांदगाव येथे कोणतीही गाडी नसल्याने गैरसोय होत आहे. त्याचप्रमाणे नांदगाव शहराच्या रहदारीचा आणि जिव्हाळ्याचा मुद्दा असलेल्या रेल्वे गेट रेल्वे प्रशासनाकडून वारंवार गेट बंद करण्यात येत असल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

रेल्वेमुळे नांदगाव शहराचे दोन भागात विभाजन झालेले असून पूर्व भागात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती झालेली असून ग्रामीण रुग्णालय, न्यायालय, बाजार समिती, तहसील कार्यालय आदी विविध शासकीय कार्यालय हे पूर्व भागात असून पश्चिम भागात व्यापारी पेठ आहे. यामुळे नागरिकांना नियमितपणे रेल्वे गेट च्या मधूनच ये जा करावी लागत असते त्यातच रेल्वे प्रशासनाने रेल्वे गेट बंद करण्याचा निर्णय घेतल्याने आणि पूर्वसूचना न देता रेल्वेगेट वारंवार बंद केले जात असते यामुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

शहरापासून उड्डाणपूल चार किलोमीटर अंतरावर असून एवढ्या लांब अंतरावरून नागरिकांना वाहने घेऊन प्रवास करावा लागत आहे. तर रेल्वे गेट पासून काही अंतरावरच अंडरपास चे काम चालू असून सदर अंडरपास हा सुरुवातीपासूनच विवादाचा केंद्रबिंदू राहिलेला आहे. सदर अंडरपासचे शहराच्या पूर्व दिशेने काटकोनात वळण असल्याने तो अत्यंत धोकादायक आहे.

यामुळे नागरिकांना त्यांच्या जीवितास धोका उत्पन्न होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याठिकाणी समांतर असा फुट ओवर ब्रीज अथवा भुयारी मार्ग तयार करण्यात यावा अथवा नागरिकांना येण्या-जाण्यासाठी छोटासा रस्ता रेल्वे गेटमधून ठेवण्यात आल्यास नागरिकांच्या दृष्टीने सोयीचे ठरू शकते. आदी शक्यतांवर यावेळी चर्चा करण्यात आली

नांदगावकरांच्या अडचणी संदर्भात रेल्वेमंत्र्यांकडे योग्य पाठपुरावा न केल्याने येथील अनेक गाड्यांचे थांबे रद्द झालेले आहेत यामुळे खासदारांनी रेल्वे थांबा बाबत त्वरित भूमिका घ्यावी असा या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन नांदगावकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नावर राजकीय जोडे बाजूला ठेवून नांदगावकरांच्या साठी एकत्र येऊन लढा उभारणे गरजेचे असल्याचे यावेळी उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले.

या बैठकीच्या दरम्यानच सदर आंदोलन पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही नांदगावकर या कृती समितीची स्थापना करण्यात आली.

याबैठकीस संतोष गुप्ता, शिवाजी पाटील, बाळासाहेब कवडे, सुमित सोनवणे, डॉक्टर सुनील तुसे, विशाल वडघुले, विजय चोपडा, वाल्मिक टिळेकर, सुमित गुप्ता, मनोज चोपडे, नाना जाधव, मुन्ना शर्मा, ॲड. सचिन साळवे, डॉ. यशवंत गायकवाड, सुनील जाधव, तुषार पांडे, कैलास महाले, राजेंद्र गांगुर्डे, रवी सानप, संजय मोकळ आदी उपस्थित होते.