नांदगाव :  १५ दुकाने सील, ८० नागरिकांकडून दंड वसूल
नाशिक

नांदगाव : १५ दुकाने सील, ८० नागरिकांकडून दंड वसूल

नगरपरिषदेकडून कारवाई

Abhay Puntambekar

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

नांदगाव शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानादेखील तोंडावर मास्क न लावणार्‍या नागरिकांसह दुकानात ग्राहकांमध्ये सुरक्षित अंतर न ठेवणार्‍या व्यावसायिकांवर नगरपरिषदेकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. ग्राहकांमध्ये सुरक्षित अंतर दिसून न आल्याने १५ दुकानांना सील करण्यात आले तर मास्क न लावणार्‍या ८० नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली गेली, अशी माहिती मुख्याधिकारी डॉ. श्रेया देवचक्के यांनी दिली.

शहरात करोनाबाधित रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रांत सोपान कासार, पोलीस उपअधीक्षक समीरसिंग साळवे, तहसीलदार उदय कुलकर्णी, पोलीस निरीक्षक संतोष मटकुळे, मुख्यधिकारी डॉ. श्रेया देवचक्के आदी अधिकार्‍यांनी शहराची पाहणी केली. सम-विषम पद्धतीने प्रतिष्ठाने सुरू व बंद ठेवण्याच्या सूचनेचे व्यावसायिकांनी पालन करावे, असे आवाहन या अधिकार्‍यांनी केले.

तसेच गांधी चौक, शनी मंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील फूटपाथवरील व्यावसायिकांना तात्पुरते दुसरीकडे स्थलांतरित करण्यात यावे, अशी सूचना प्रांत कासार यांनी मुख्याधिकार्‍यांना केली. शहरात फिरणार्‍या ८० जणांवर कारवाई करण्यात येऊन ३१ हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. देवचक्के यांनी दिली.

Deshdoot
www.deshdoot.com