मविप्रच्या रुग्णालयात 636 रुग्णांची करोनावर मात
मविप्रच्या रुग्णालयात 636 रुग्णांची करोनावर मात
नाशिक

मविप्रच्या रुग्णालयात 636 रुग्णांची करोनावर मात

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

मविप्रच्या डॉ. वसंतराव पवार वैदयकिय महाविद्यालयाच्या रुग्णालयात 901 कोविड रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. त्यात 636 रुग्ण बरे झाले असून यात पोलीस व त्यांचे नातेवाईक आणि सामान्य नागरिकांचा समावेश आहे.

रुग्णालयातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 71 टक्के इतके आहे. तर महाविद्यालयातील कोविड टेस्टिंग लॅबमध्ये जुलै अखेर तेरा हजार चाळीस रुग्णांचे करोना स्वॅब टेस्ट करण्यात आले आहेत.

महाविद्यालयाच्या डेडिकेटेड कोविड रुग्णालय (डीसीएच) 60 खाटा तर कोविड केयर सेंटरमध्ये 100 खाटांचे रुग्णालय आहे. या कोविड रुग्णालयातील डीसीएच मध्ये अति गंभीर बाधित रुग्णांसाठी आरआयसीयु या विशेष अतिदक्षता कक्षात चोवीस तास तज्ज्ञ् डॉक्टरांच्या देखरेखीखाली व सल्ल्याने औषधोपचार केले जातात.

तसेच रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेतांना चांगल्या दर्जाचे जेवण, शुद्ध पिण्याचे पाणी, गरम पाणी पुरविले जात आहे. मविप्रच्या रुग्णालयात मागील 1 मेला पहिला करोना बाधित रुग्ण दाखल झाला होता. डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात करोनाच्या प्रारंभी च्या काळात करोना विषयक स्वतंत्र स्क्रिनिंग ओपीडी सुरु करण्यात आली.

ती आजही सुरु असून या ठिकाणी रुग्णालयात येणार्‍या प्रत्येक रुग्णाची तपासणी करण्यात येते व प्राथमिक लक्षणे असलेली व संशयित रुग्णांना वेगळे करण्यात येते. आजवर या कोविड बाह्यरुग्ण विभागात जुलै अखेर 8175 इतक्या रुग्णांची करोनाविषयक प्राथमिक तपासणी करण्यात आली आहे.

रुग्णांना उत्तम आरोग्य सुविधा कशा पुरविता येईल, या करीता अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील, शिक्षणाधिकारी डॉ. नानासाहेब पाटील व हॉस्पिटलची सर्व टीम अहोरात्र काम करत आहे. दररोज सकाळी व सायंकाळी बाधित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी रुग्णालयात मिळत असलेल्या उपचार आणि सोयी- सुविधांबाबत संवाद साधला जात आहे. आतापर्यंत 636 रुग्णांनी करोनावर मात केली आहे.
- नीलिमाताई पवार, सरचिटणीस.मविप्र
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com