मविप्रचे रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांना प्राधान्य: निलीमा पवार

मविप्रचे रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांना प्राधान्य: निलीमा पवार

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून मराठा विद्याप्रसारक समाज शिक्षण संस्थेचे (Maratha Vidyaprasarak Samaj Education Institute) कार्य सुरू असून रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्यास संस्थेने प्राधान्य दिले आहे.

त्यामुळे भविष्यात वैद्यकिय (Medical), प्रिटींग टेक्नॉलॉजी (printing technology), टेक्सटाईल इंजिनिअरींग (Textile Engineering) यासारख्या स्वयंरोजगार निर्माण करणार्‍या अभ्यासक्रमांसह स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र (Competitive Exam Guidance Centre) लवकरच सुरू करण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन मविप्र सरचिटणीस निलिमा पवार (MVP General Secretary Nilima Pawar) यांनी येथे बोलतांना केले.

तालुक्यातील चिंचावड व जळगाव गा. येथील जनता विद्यालयांसह सोयगाव महाविद्यालयाच्या नुतन इमारतींचे उद्घाटन करतांना मविप्र सरचिटणीस पवार बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे तर प्रमुख अतिथी म्हणून मविप्र सभापती माणिकराव बोरस्ते, उपसभापती राघो अहिरे, चिटणीस सुनिल ढिकले व विशेष अतिथी म्हणून महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष सुरेश निकम, प्रसाद हिरे, राजेंद्र भोसले, माजी उपमहापौर नीलेश आहेर, मदन गायकवाड, अरूण देवरे, काशिनाथ पवार, विजय पवार, अ‍ॅड. आर.के. बच्छाव आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यावर मविप्र संस्थेचा विशेष भर असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होण्यासाठी संस्थेतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन केले जात असल्याचे सांगून श्रीमती पवार पुढे म्हणाल्या, संस्थेमार्फत लवकरच प्रिटींग टेक्नॉलॉजी, टेक्सटाईल इंजिनिअरींग, वैद्यकिय अभ्यासक्रम तसेच स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करत ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे संस्थेचे ब्रीद पुर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला जाईल.

मालेगाव (malegaon) येथे तालुक्यातील गोरगरीब रूग्णांसाठी लवकरच डॉ. वसंतराव पवार वैद्यकिय महाविद्यालय (Dr. Vasantrao Pawar Medical College) रूग्णालयाचे बाह्य रूग्ण तपासणी केंद्र सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी जाहिर केले. मविप्र संस्थेचा दिवसागणिक विस्तार वाढत असून विद्यार्थी व सभासदांना संस्थेच्या विविध उपक्रमांची व कार्याची नेमकी माहिती उपलब्ध होण्यासाठी संस्थेतर्फे शैक्षणिक सहलींचे आयोजनही केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिस्त, गुणवत्ता व पारदर्शकता या त्रिसुत्रीच्या आधारे संस्थेचे कामकाज सुरू असल्याचेही श्रीमती पवार यांनी शेवटी बोलतांना सांगितले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. तुषार शेवाळे यांनी ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ या ब्रीद वाक्यानुसार संस्थेचे कामकाज सुरू असल्याचे सांगितले. सोयगावने सर्वांची सोय केली असून तीन एकर जागेत मविप्र संस्थेच्या महाविद्यालयासाठी प्रशस्त वास्तू उभारण्यात आल्याने परिसरातील विद्यार्थ्यांच्या (students) उच्चशिक्षणाची मोठी सोय झाली आहे. लवकरच याठिकाणी स्पर्धा परिक्षा केंद्र सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांना उच्चपदस्थ अधिकारी होण्यासाठी अभ्यास व मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकिय महाविद्यालय रूग्णालयामुळे देखील आजवर तालुक्यातील असंख्य गोरगरीबांना वैद्यकिय सुविधेचा लाभ मिळाला असल्याने मविप्र संस्था समाजाचा मानबिंदू ठरली असल्याचे डॉ. शेवाळे यांनी नमूद केले.

प्रारंभी संस्थेचे तालुका संचालक डॉ. जयंत पवार यांनी प्रास्ताविक केले. मालेगाव (malegaon) येथे वैद्यकिय महाविद्यालयासह एमबीए (MBA), आयटी (IT), टेक्सटाईल इंजिनिअरींग (Textile Engineering), इंग्लीश स्पिकिंग कोर्स (English Speaking Course) सुरू करण्यासाठी संस्थेने झुकते माप द्यावे, अशी मागणीही डॉ. पवार यांनी केली. यावेळी सुरेश निकम, माणिकराव बोरस्ते, प्रसाद हिरे, राजेंद्र भोसले, नीलेश आहेर आदींची समयोचित भाषणे झालीत.

कार्यक्रमास नामदेव महाले, प्रताप गडाख, भाऊसाहेब ठाकरे, नुतन भालेराव, दत्तात्रेय पाटील, हेमंत वाजे, प्रशांत देवरे, रायभान काते, सचिन पिंगळे, नारायण हिरे, भास्कर बच्छाव, स्वप्निल निकम, मधुकर पाटील, संस्थेचे शिक्षणाधिकारी एस.के. शिंदे, प्राचार्य हिरामण क्षिरसागर, डॉ. सयाजी पगार आदींसह संस्थेचे आजी-माजी पदाधिकारी, सभासद, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व शिक्षणप्रेमी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com