मविप्र निवडणूक : आता इच्छुकांकडून उमेदवारीसाठी लॉबिंग सुरू

मविप्र निवडणूक : आता इच्छुकांकडून उमेदवारीसाठी लॉबिंग सुरू

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या निवडणुकीसाठी ( Maratha Vidyaprasarak Samaj Sanstha Elections )उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या गुरुवार (दि.११) अखेरच्या दिवससापर्यंत ३०५ उमेदवारांनी ४१० उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आता संपलेली आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांनी एकाच नव्हे तर अनेक पदांसाठी अर्ज दाखल केले आहेत.त्यामुळे आता आपल्या इच्छेनुसार पाहिजे त्याच पदासाठी उमेदवारी मिळावी,यासाठी इच्छुकांकडून जोरदार लॉबिंग सुरू झाली आहे. त्यामुळे  उमेदवारी द्यायची कोणाला ? यासाठी पॅनल प्रमुखांचा आता चांगलाच कस लागणार असल्याने त्यांचाही  अभ्यास सुरू झाला आहे.

सत्ताधारी व विरोधी गटांकडून मंगळवारी व बुधवारी असे सलग दोन दिवस शक्ती प्रदर्शन करत आपापल्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले. दोन्ही गटांकडून अर्ज दाखल झाले असले तरी आता खऱ्या अर्थाने पॅनलच्या नेतृत्वाचीच खरी कसोटी लागणार आहे. जे विद्यमान पदाधिकारी व सदस्य आहे,त्यांनी आपण सध्या असलेल्या पदाबरोबरच इतरही पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे. त्यामुळे कोणाला कोणत्या पदासाठी उमेदवारी मिळेल हे इच्छुकांबरोबरच त्यांच्या समर्थकांनाही पूर्णतः याचा अंदाज आलेला नाही.

त्यामुळे समर्थकांच्या जोरावर इच्छुक उमेदवारांकडून पॅनलच्या नेतृत्वाकडे आपल्याला ठराविक पदासाठीच उमेदवारी मिळावी, यासाठी जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात झाली आहे.यासाठी पॅनलचे नेतृत्व करणाऱ्यांचे उंबरेही झीजविले जात असल्याचे चित्र आहे.एकेका पदासाठी मग ते पदाधिकारी असो की तालुका सदस्य पद असो एकापेक्षा अनेक उमेदवारांनी उमेदवारी दाखल करत उमेदवारीवर दावाही केला आहे. त्यामुळे पॅनल नेतृत्वाला आता कोणाला उमेदवारी द्यायची आणि कोणाला थांबवायचे हे करताना चांगलाच कस लागणार आहे.

अध्यक्षपदासह उपाध्यक्ष, सरचिटणीस,चिटणीस, सहचिटणीस, सभापती, उपसभापती या प्रमुख पदांसह तालुका संचालक सदस्यत्वासाठी एकापेक्षा अनेक इच्छुकांनी दोन्ही पॅनल कडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे. एवढेच नव्हे तर दोन जागा राखीव असलेल्या महिला सदस्य पदासाठीही महिलांची उमेदवारी दाखल करण्याची संख्या अधिक आहे. त्यामुळे सत्ताधारी प्रगती पॅनल व परिवर्तन पॅनलच्या प्रमुखांची डोकेदुखी आता उमेदवारी माघारीपर्यंत वाढणार आहे.

मुहूर्त पाहून केले अर्ज दाखल

सत्ताधारी व विरोधी गटाच्या इच्छुक उमेदवारांनी बुधवार व गुरुवार असे दोन दिवस पॅनलच्या सर्वच उमेदवारांबरोबर उमेदवारी अर्ज दाखल केले. यातील काही उमेदवारांनी उमेदवारी दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी(दि.११) देखील पुन्हा अर्ज दाखल केले.कारण ज्योतिषाकडून मुहूर्त काढलेला असल्याने त्यांनी मुहूर्त साधत उमेदवारी अर्ज दाखल केले.त्यामुळे शेवटच्या दिवशीही अर्ज दाखल करण्यासाठी विद्यमान सदस्य,पदाधिकाऱ्यांसह इच्छुक उमेदवारांची गर्दी दिसून आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com