मविप्र निवडणूक : आता कसोटी नेतृत्वपदाची

मविप्र निवडणूक : आता कसोटी नेतृत्वपदाची

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या निवडणुकीसाठी ( Election of Maratha Vidya Prasarak Samaj Sanstha) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा गुरुवार (दि.11) अखेरचा दिवस आहे. दरम्यान, सत्ताधारी व विरोधी गटांकडून मंगळवारी व बुधवारी असे सलग दोन दिवस शक्ती प्रदर्शन करत आपापल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले.

दोन्ही गटांकडून अर्ज दाखल झाले असले तरी आता खर्‍या अर्थाने पॅनलच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. एकेका पदासाठी मग ते पदाधिकारी असो की तालुका संचालक असो एकापेक्षा अनेक उमेदवारांनी उमेदवारी दाखल करत उमेदवारीवर दावाही केला आहे. त्यामुळे पॅनल नेतृत्वाला आता कोणाला उमेदवारी द्यायची आणि कोणाला थांबवायचे हे करताना चांगलाच कस लागणार आहे.

अध्यक्षपदासह उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, सहचिटणीस, सभापती, उपसभापती या प्रमुख पदांसह तालुका संचालक सदस्यत्वासाठी एकापेक्षा अनेक इच्छुकांनी दोन्ही पॅनलकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे. एवढेच नव्हे तर दोन जागा राखीव असलेल्या महिला सदस्य पदासाठीही महिलांची उमेदवारी दाखल करण्याची संख्या अधिक आहे. त्यामुळे सत्ताधारी प्रगती पॅनल व परिवर्तन पॅनलच्या प्रमुखांना कोणाला उमेदवारी द्यायची? याची डोकेदुखी आता उमेदवारी माघारीपर्यंत चांगलीच वाढणार आहे. कोणाला थांबवायचे आणि कोणाला चाल द्यायची हे करताना कसोटी लागणार आहे. यातून नाराजी नाट्यही रंगणार हे निश्चित आहे. त्यामुळे दोन्ही पॅनलकडून अगदी शेवटच्या क्षणापर्यंत खलबते सुरू होणार आहेत.

डॉक्टरांमध्ये लढत की, व्याही समोरासमोर

चांदवडचे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल व माजी आमदार उत्तमबाबा भालेराव यांनी चांदवड तालुका संचालक सदस्यपदासाठी दोन्ही परस्पर विरोधी गटांकडून उमेदवारी दाखल केली आहे. याचबरोबर डॉ. सयाजीराव गायकवाड व डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनीही परस्पर विरोधी गटाकडून चांदवड तालुक्यातून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे नीलिमा पवार यांच्या पॅनलकडून भालेराव की डॉ.कुंभार्डे आणि ठाकरे यांच्या पॅनलकडून कोतवाल की डॉ. गायकवाड यांना पसंती मिळते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दोन्ही पॅनलकडून भालेराव व कोतवाल यांना परस्पर उमेदवारी मिळाल्यास दोन व्याह्यांमध्ये लढत होईल, आणि दोन्ही पॅनलकडून डॉ. कुंभार्डे व डॉ. गायकवाड यांना जर उमेदवारी मिळाली तर दोन डॉक्टरांमध्ये लढत होईल. आणि कोतवाल व डॉ. कुंभार्डे यांना जर उमेदवारी मिळाली तर गुरु शिष्यामध्ये ही लढत होईल.

शेटेंनी केले पत्ते ओपन

समाजाचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे हे काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे आणि समाजाचेही लक्ष लागले होते. मात्र, शेटे यांनी बुधवारी (दि.10) प्रगती पॅनलच्या झालेल्या सभासद जिल्हा मेळाव्यात उपस्थित राहत सभासदांना मार्गदर्शन केले. त्यामुळे त्यांची भूमिका आता सभासद बांधवांना समजली आहे. शेटे यांनी या सभासद मेळाव्यात प्रगती पॅनलच्या मागे उभे राहावे, असे आवाहन सभासदांना केले. यामुळे त्यांची भूमिका काय आहे, हे आता सभासदांना स्पष्ट झाले आहे.

पारंपरिक विरोधक आहेर-पवार एकत्र

मविप्रच्या आजपर्यंतच झालेल्या निवडणुकीत स्व. डॉ. डी. एस. आहेर व स्व. डॉ. वसंत पवार हे पारंपरिक विरोधक कुटुंबिय या वेळच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आल्याचे चित्र बुधवारी (दि.10) झालेल्या प्रगती पॅनलच्या मेळाव्यात दिसून आले. मेळाव्यात बोलताना स्व. डॉ. आहेर यांचे चिरंजीव आमदार डॉ. राहुल आहेर यांनी आम्ही आहेर कुटुंबीय आता पवार कुटुंबासमवेत असल्याचे आश्वासन देत यापुढे आहेर कुटुंबातर्फे केदा आहेर हे उमेदवारी करतील,असे जाहीर केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com