सातपूर l Satpur (प्रतिनिधी)

कामगारांच्या सुरक्षेला कंपनी व्यवस्थापनाने महत्त्व देण्याची गरज आहे. त्यासोबतच कामगार आयुक्तालयासोबतच कारखाना व्यवस्थापनांना परवानगी देणार्या शासनाच्या प्रत्येक विभागाचा परस्परांशी समन्वय असणे गरजेचे आहे. औद्योगिक शांतता अबाधित राखण्यासाठी ही बाब महत्त्वाची असल्याचे पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी निपमच्या चर्चासत्रात स्पष्ट केले.

निपम व अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड मॅनेजमेंटतर्फे निवेक सभागृहात आयोजित परिसंवादात ’औद्योगिक शांततेसाठी पोलिसांची भूमिका’ यावर पोलिस आयुक्त दीपक पांडेय हे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त विजय खरात, संग्रामसिंग निशाणदार, अमोल तांबे हे होते.

सूरूवातीला अध्यक्ष सुधीर पाटील व सचिव चंदन जंबियार यांनी कारखाना व आस्थापनेत व्यवस्थापनाची भूमिका व कामगारांमध्ये अंमलबजावणी करताना येणार्या अडचणीं, त्यांना सामोरे जाताना करावी लागणारी धडपड यावर सविस्तर मार्गदर्शन केले. युनियनच्या माध्यमातून किरकोळ बाबींवर कामगार आक्रमक होत असल्यामुळे समन्वय बिघडत असल्याचेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात अभिनव इन्स्टिट्यूटचे सादरीकरण सुधीर दीक्षित यांनी केले. माजी अध्यक्ष डॉ. उदय खरोटे, श्रीधर व्यवहारे, विनायक पाटील, माधव जाजू, दिलीप महाले, बापू खैरनार, विश्वनाथ डागरे, पोपटराव सावतं प्रकाश गुंजाळ, रमेश गवळी, जे. के. शिदे, जितेंद्र कामाठीकर, राहुल बोरसे, भास्कर मोरे, प्रकाश बारी, रविकिरण मोरे उपस्थित होते.

कंपनी आवारात सुरक्षेचे उपाय हवे औद्योगिक शांततेसाठी कंपनी व्यवस्थापनाची भूमिकाही महत्त्वाची असते. कंपनीच्या आवारात सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे आदींची सोय करणे गरजेचे आह. त्यातून वस्तूस्थितीचे ज्ञान होते. औद्योगिक शांंतता प्रस्थापित होण्याने नव नवीन उद्योग औद्योगिक क्षेत्रात उभारले जाऊ शकतील.
दीपक पांडेय, पोलिस आयुक्त, नाशिक