लग्नाच्या अठराव्या दिवशीच पतीकडून पत्नीचा खून

फुलेनगर येथील घटना
लग्नाच्या अठराव्या दिवशीच पतीकडून पत्नीचा खून

पंचवटी । Panchvati

मामाच्या मुलीसोबत लग्न होऊन जेमतेम अठरा दिवस होत नाही तोच चारित्र्याचा संशय घेत पतीने नवविवाहित पत्नीचा खून केल्याची घटना शनिवारी (दि.१८) फुलेनगर परिसरात घडली. या घटनेमुळे फुलेनगर परिसरात खळबळ उडाली आहे. हत्या केल्यानंतर संशयित पती स्वतः पंचवटी पोलिस ठाण्यात येऊन घडला प्रकार कथन केला. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेत खुनाचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलिस करीत आहेत.

सागर गणपत पारधी (वय २३, राहणार, मुंजोबा गल्ली, तीन पुतळ्या मागे, फुलेनगर, पेठरोड) असे पत्नीची हत्या करणाऱ्या संशयित पतीचे नाव आहे. त्रंबकेश्वर तालुक्यात वास्तव्यास असलेल्या मामाची मुलगी आरती (वय १९) हिच्याशी दि.१ जुलै रोजी मोठ्या थाटामाटात विवाह झाला. लग्नास जेमतेम अठरा दिवस होत नाही तोच नवविवाहित पत्नीवर चारित्र्याचा संशय पती घेत होता.

हमाली काम करणाऱ्या सागर याने शुक्रवारी (दि.१७) रात्री याच कारणावरून पत्नी आरती हिच्यासोबत भांडण झाले. यानंतर दोघांसह घरातील अन्य सदस्य झोपी गेले. डोक्यात राग धरून असलेल्या संशयित सागर याने शनिवारी (दि.१८) पहाटे साडे तीन चार वाजेच्या सुमारास पत्नी आरती हिचा गळा आवळून आणि डोक्यात पाटा टाकत खून केल्याची घटना घडली. पंचवटी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.

दरम्यान, पत्नीची हत्या करून संशयित पती स्वतः पोलिस ठाण्यात हजर होत घडला प्रकार पोलिसांसमोर कथन केला. पोलिसांनी संशयितास ताब्यात घेत खुनाचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे करीत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com