लग्नपत्रिका वाटायला गेलेल्या नवरदेवाचा खून

लग्नपत्रिका वाटायला गेलेल्या नवरदेवाचा खून

उद्या होणार होते लग्न, इगतपुरी तालुक्यातील घटना

इगतपुरी : Igatpuri

स्वतःच्या ३ मे ला होणाऱ्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिका वाटायला गेलेल्या युवकाचा शेणवड बुद्रुक खडकवाडी भागात मृतदेह आढळून आला. आज सकाळी उघडकीस आलेल्या ह्या घटनेमुळे माणिकखांब भागात दुःखाचे सावट पसरले आहे. छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह असल्याने ह्या युवकाचा हा निर्घृण खून असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

घोटी पोलिसांनी तपास सुरू केला असल्याचे समजते. कु. गजानन हरिश्चंद्र चव्हाण असे युवकाचे नाव असून उद्या त्याचे लग्न होणार होते. ह्या घटनेबाबत कोणाला काहीही माहिती असल्यास घोटी पोलिसांना कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, माणिकखांब ता. इगतपुरी येथील कु. गजानन हरिश्चंद्र चव्हाण हा युवक अतिशय मनमिळाऊ आणि प्रामाणिक म्हणून प्रसिद्ध आहे. परवा त्याचा विवाह सोहळा असल्याने त्याने शुक्रवारी रात्री आईवडिलांना सांगून शेणवड बुद्रुक खडकवाडी भागात निमंत्रण पत्रिका देऊन येतो असे सांगितले.

मात्र फार उशीर झाल्याने त्याचे कुटुंबीय हवालदिल झाले. मात्र सकाळी तरी येईल या आशेने ते वाट पाहत होते. शेणवड बुद्रुक खडकवाडी भागात निर्जन स्थळी त्याचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत असल्याची माहिती घोटी पोलिसांना ग्रामस्थांनी कळवली.

प्रथमदर्शनी हा निर्घृण खून असल्याचे ग्रामस्थ सांगतात. घोटीच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. अज्ञात खुनी व्यक्तींना तातडीने शोधावे यासाठी युवकाचे नातेवाईक संतप्त भावना व्यक्त करीत आहेत. ह्या प्रकरणी कोणाला काहीही माहीत असल्यास तात्काळ घोटी पोलिसांना माहिती द्यावी.

दरम्यान ह्या प्रकरणी घोटी पोलिसांकडून वेगाने तपास सुरू करण्यात आल्याचे समजते. गजानन चव्हाण ह्याच्या हळदीच्या दिवशीच काळाने घाला घातल्याने माणिकखांब ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com