पाटोदा | वार्ताहर

पाटोदा येथे आज सकाळी जुन्या उधारीच्या वादातून झालेल्या हाणामारीत ठाणगाव येथील एकाचा बळी गेला आहे...

ठाणगाव येथील संजय रामचंद्र शिंदे (वय 40) यांचेकडे पाटोदा येथील अर्जुन वाळूबा कुऱ्हाडे यांची दिड वर्षांपूर्वीची एक हजार रुपयांची उधारी होती.

वेळोवेळी मागणी करूनही शिंदे यांनी कुऱ्हाडे यांचे पैसे परत न केल्यामुळे आज सकाळी दोघांमध्ये दारू पिऊन वादावादी झाली. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले.

त्यानंतर शिंदे जखमी अवस्थेत तिथेच पडून राहिल्यामुळे पोलीस पाटील मुजमील चौधरी यांनी येवला तालुका पोलीस स्टेशनला माहिती देत ॲम्बुलन्स मधून त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र पाटोदा येथे तपासणीसाठी घेऊन गेले, परंतु येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुढील तपासणीसाठी येवला येथे पाठवले असता ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय सूत्रांनी त्यास मृत घोषित केले.

या प्रकरणी घटनेची माहिती मिळताच, येवला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिकांची चौकशी करून संशयित म्हणून अरुण वाळुबा कुऱ्हाडे यांना पुढील अधिक तपासासाठी ताब्यात घेतले आहे.

हा खून जुगार व दारुसाठी झालेल्या उधार पैशांमधून झाली असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे. पाटोदा येथे यापूर्वीही 2011-12 मध्ये दारूच्या नशेत एका व्यक्तीने खून केलेला होता.

आता पुन्हा हा खून झाल्यामुळे पाटोदा येथील दारूचा आणि नशेबहादरांचा प्रश्न पुन्हा एकदा गुन्हेगारी प्रवृत्तीकडे घेऊन जाणारा ठरला आहे.

पाटोदा हे गाव आजूबाजूच्या बारा खेड्यांना जोडलेले असल्यामुळे व येथे परवानाधारक दारू दुकान व इतर अवैध दारू गुत्तेही असल्याची चर्चा असते, त्यामुळे आजूबाजूच्या खेड्यातील तळीरामांची पाटोद्यात रेलचेल असते. परंतु त्यामुळे गावाचे नाव खराब होते असेही अनेकांचे मत आहे.