अखेर 'त्या' खुनाचा उलगडा झालाच..

वणी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
अखेर 'त्या' खुनाचा उलगडा झालाच..

चिंचखेड । Chinchkhed

दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) अवताळे येथे जगदीश संजय भोये (२२) या इसमाचा २६ जून रोजी दगडाने ठेचून खून (Murder) केल्याचा प्रकार घडला होता. तसेच त्याचे प्रेत अवताळे शिवारातील (Avtale Shiwar) काचवाल्याच्या पडक्या घरात आढळून आले होते. त्यानंतर वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Vani Police Thane) करण्यात आला होता.

सदरील गुन्ह्यात कोणताही पुरावा मिळून येत नव्हता. त्यामुळे पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे ठाकले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक सचिन पाटील (Superintendent of Police Sachin Patil) अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वनी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत तसेच त्यांच्या संपूर्ण पोलीस स्टाफ ने आजूबाजूच्या गावात तसेच संपूर्ण नाशिक जिल्ह्यात (Nashik District) कसून चौकशी केली. त्यानंतर असे निदर्शनास आले की मृत इसमाचा जोडीदार विष्णू वाळू बागुल हा गुन्हा घडल्यापासून फरार आहे.

त्यानंतर त्याचा शोध घेतला असता त्याचे कोणतेही लोकेशन मिळत नव्हते. परंतु १७ जुलै रोजी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार बागुल हा गुजरात राज्यातील एका खेडेगावात राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वणी पोलिस ठाण्याचे पोलीस पथक गुजरात मध्ये रवाना झाले. तसेच संशयिताची माहिती घेत शिताफीने त्यास ताब्यात घेऊन १८ जुलै रोजी वनी पोलीस स्टेशनला आणण्यात आले.

सदर गुन्ह्यासंदर्भात संशयित इसम विष्णू बागुल याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदरचा खून केल्याचे कबूल केले. त्यानंतर लगेचच त्यात सदर गुन्ह्यात अटक करण्यात येऊन त्याची कोर्टाकडून चार दिवस पोलिस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे. या तपासासाठी वणी पोलिस ठाण्याचे विजय बच्छाव, रोहिदास टोपले, कुणाल मराठे, सुमित जाधव गुजरात मध्ये तपासासाठी रवाना झाले होते.

या गुन्ह्यात आरोपीने कोणताही एक पुरावा मागे ठेवलेला नव्हता. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास लागणे अधिक कठीण होते. ते आव्हान स्वीकारून पोलिसांनी अथक प्रयत्नानंतर आरोपीस अटक केली. वनी पोलिसांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com