पेठ | प्रतिनिधी

पेठ तालुक्यातील कोपूर्ली खु येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार पेठ तालुक्यात घडला. या प्रकाराने प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोस्को आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

अधिक माहिती अशी की, तिरडे येथील रहिवाशी असलेल्या संशयित दत्तू काशिनाथ खैर याने ओळखीचा फायदा घेऊन या अल्पवयीन बालिकेला फूस लाऊन पळवून नेले होते. यादरम्यान, मुलीच्या घरच्यांनी तिचा अनेक ठिकाणी शोध घेतला परंतु मुलगी मिळून आली नाही. दरम्यान, याकाळात संशयिताने या बालिकेवर लैंगिक अत्याचार केले.

दरम्यान, मुलीच्या घरच्यांनी पोलिसांत गुन्हा दाखल केल्याची माहिती संशयिताला मिळाली. यानंतर त्याने कोपुर्ली शिवारातच तिच्यावर अत्याचार करून तिचा जीव घेतला. याप्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात भादवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शवविच्छेदनानंतर कलम ३७६ , ३०२ अन्वये व बालकांचे लैंगीक अत्याचारापासुन संरक्षण ( पास्को अंर्तगत ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पोलीस निरीक्षक राधेश्याम गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. संदीप वसावे अधिक तपास करीत आहेत.

दरम्यान, अल्पवयीन पिडीतेचे शवविच्छेदन जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्यात आले. त्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.