
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
अलीकडे सायबर गुन्ह्यांची (Cyber crime) संख्या वाढत असताना या गुन्हेगारांची वक्रदृष्टी आता थेट नाशिक महानगर पालिकेच्या (Nashik Municipal Corporation) संकेतस्थळावर पडल्याचे निदर्शनास आले आहे.
महानगरपालिकेच्या वेबसाइटवर सायबर हल्ला (cyber attack) झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान या सायबर हल्यामुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली. यापूर्वीही पालिकेची वेबसाइट हॅक केल्याची घटना घडली होती. त्यामुळे महानगरपालिकेची वेबसाइट हॅकर्सच्या टार्गेटवर असल्याचे स्पष्ट होत आहे.
नाशिक महानगर पालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर सायबर हल्ला केल्यानंतर हॅकर्सने (Hackers) त्यावर हॅक केल्याची इमेज सुद्धा अपलोड केली होती. त्यामुळे नाशिक महानगर पालिकेच्या वेबसाईटवर हॅकर्सने सायबर हल्ला केल्याचं स्पष्ट झाले.
हॅकर्सने यावेळी संपूर्ण डेटा हॅक केल्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याने साईट हॅक झाल्याचा फोटो अपलोड केला आहे. नाशिक महानगर पालिकेच्या जाहीर केलेल्या वृत्त प्रसारण आणि घोषणा करणाऱ्या टॅब वर हा हल्ला झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत होते.
यापूर्वीही याच वेबसाईटवर सायबर हल्ला झाला होता. त्यानंतर डेटा चोरीला गेल्याची भीती व्यक्त केली जात होती, वेबसाईटवर झालेला हल्ला तो कशाप्रकारे झाला, हे तपासणे महत्वाचे आहे. दरम्यान हा हल्ला कोणी, कधी, कशाप्रकारे केला आहे, याचा पुरावा गोळा करणे आणि संबंधितावर कारवाई करणे आवश्यक आहे.
यासह महापालिकेच्या (Municipal Corporation) वेबसाइटवर पुन्हा सायबर हल्ला होऊ नये यासाठी वेबसाईट सुरक्षित करून घेणे, वारंवार वेबसाईट हॅक का केली जात आहे. याचेही कारण शोधणे आवश्यक असल्याचे मत सायबर तज्ज्ञ तन्मय दीक्षित यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान वेबसाइटवर हल्ला झाल्यानंतर पालिकेचे संकेतस्थळ काही काळ बंद असल्याचेही निदर्शनास आले आहे.