क्षयरोग सद्यस्थितीबाबत मनपाचे सर्व्हेक्षण

क्षयरोग सद्यस्थितीबाबत मनपाचे सर्व्हेक्षण

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक शहर आणि जिल्हा क्षयरोगमुक्त (Tuberculosis free )करण्यासाठी शहरातील वॉर्ड क्रमांक 2 आणि वॉर्ड क्रमांक 89 या दोन वॉर्डांमध्ये महानगरपालिकेतर्फे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे.

कुटुंब कल्याण मंत्रालय व केंद्रिय क्षयरोग विभाग यांच्या उपक्रमातंर्गत उपराष्ट्रीय प्रमाणपत्र पुरस्कारासाठी नाशिक शहर व जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत देशातून सन 2025 पर्यंत क्षयरोगाचे दुरीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याचाच एक उपक्रम म्हणून महापालिकेतर्फे क्षयरोग सद्यस्थितीबाबत 12 डिसेंबरपासून सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

शासनाच्या मार्गदशक सूचनानुसार स्वयंसेवक घरोघरी जाऊन क्षयरोगबाबत आत्ताच्या स्थितीबाबत माहिती घेऊन सर्व्हेक्षण करणार आहेत. 2015 च्या क्षयरुगणांच्या तुलनेत आत्ताची रुग्णसंख्या किती आहे याबाबत या सर्व्हेक्षणातून माहिती उपलब्ध होणार आहे. 2015 ते 2022 पर्यंतच्या रुग्णांची माहिती, खासगी व शासकीय टी. बी. विरोधी औषध विक्रीची पडताळणी तसेच विविध निकषांची पडताळणी करून सद्यस्थितीचा अहवाल तयार करण्यात येणार आहे.

या सर्व्हेक्षणात वॉर्ड क्रमांक 2 मधील गोरक्ष नगर ते स्नेहनगर ( साईबाबा मंदिर) दिंडोरी रोड व वॉर्ड क्रमांक 89 (नवीन नाशिक ) मधील पांगरे मळा, खोडे मळा, बडदे नगर, तुळजा भवानी मंदीर, अचानक चौक दवाखाना परिसर या भागात स्वयंसेवक यांचेमार्फत सोमवार (दि. 12 डिसेंबर) पासून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सदर सर्वेक्षणाचा कालावधी एक महिना असणार आहे. दोन स्वयंसेवकांचा चमू घरोघरी जाऊन ऑनलाईन पद्धतीने सर्व माहिती भरून घेणार आहे.

तसेच मधुमेहसारखा आजार असल्यास एक दिवस खोकला असला तरी तपासणी करणे आवश्यक आहे. या सर्व्हेक्षण दरम्यान स्थानिक नागरिकांनी तसेच सामाजिक संस्था, मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भागात, घरी येणारे स्वयंसेवक, क्षयरोग कर्मचारी यांना सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका शहर क्षयरोग अधिकारी डॉ. कल्पना कुटे यांनी केले आहे. या सर्व्हेक्षण दरम्यान बेंगळुरु येथील आयसीएममार संस्था आणि दिल्लीतील सेंट्रल टीबी डीव्हीजनचे प्रतिनिधी तसेच जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार भेट देणार आहेत.

लक्षणे असल्यास तपासणी करा

1) दोन आठवड्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला

2) सायंकाळी हलकासा ताप येणे

3) भूक मंदावणे

4) वजनात लक्षणीय घट

5) थुंकीवाटे रक्त पडणे

6) चालताना धाप लागणे

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com