करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगर पालिकेकडून शर्थीचे प्रयत्न- आयुक्त गमे

करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगर पालिकेकडून शर्थीचे प्रयत्न- आयुक्त गमे

नाशिक । प्रतिनिधी

शहरात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामाजिक अंतर पाळणे , मास्क वापरणे, गर्दी टाळणे या अगदी साध्या बाबी सर्वानी पाळायला हव्यात . शहरात करोना प्रादुर्भाव वाढत असताना काही उणिवा असल्यातरी महापालिकेकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. नागरिकांना आता करोनाबरोबर जगण्याचे शिकावे लागणार असुन हा प्रादुर्भाव रोकण्यासाठी आता नागरिकांकडून सहकार्य अपेक्षित आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली.आज आयुक्त गमे यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे शहरातील संपादक, प्रसारमाध्यम प्रतिनिधी यांच्यासोबत घेतलेल्या कोविड - १९ संदर्भात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

नाशिक महापालिका क्षेत्रात गेल्या महिन्यात १९ मे पर्यत ५० पेक्षा कमी करोना रुग्ण होते, असे सांगत आयुक्त अनलॉक सुरू झाल्यानंतर आता करोना रुग्णांचा आकडा १६०० पर्यत जाऊन पोहचला आहे. हा वाढता आकडा लक्षात घेऊन आम्ही आता मोठ्या प्रमाणात संशयितांच्या चाचण्या सुरू आहे. शहरातील मेजर हॉटस्पॉट दिसुन येत असलेले पंचवटीतील फुलेनगर, वडाळागांव, जुने नाशिक भागातील नाईकवाडीपुरा, कुंभारवाडा या ठिकाणी महापालिकेकडुन नागरिकांचा सर्व्हे करीत असुन बाधीतांच्या संपर्कातील अति आणि कमी जोखमीच्या लोकांवर उपचार करीत आहे. शहरात कुंभारवाडा, वडाळागांव व फुलेनगर या भागात शहरी आरोग्य केंद्रात आता बाह्यरुग्ण तपासणीची सेवा सुरु करण्यात आले आहे.

रुग्णांचा वाढत असलेला आकडा लक्षात घेऊन खाटांचे नियोजन केले जात आहे. मृत्यु झालेल्या 60 व्यक्तींना अगोदर इतर आजार होतेे. यात नेमका कशामुळे मृत्यु झाले संदर्भात विश्लेषण केले जात असुन यातून काही माहिती समोर आल्यास उपचार - औषधांत बदल करता येणार आहे. तसेच सध्या रुग्णांवर उपचार करणार्‍या महापालिकेच्या डॉक्टरांना व्यवस्थापन - उपचारासंदर्भात डॉ. संजय ओक यांच्यामार्फत प्रशिक्षण देण्यात असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.

शहरातील ठक्कर डोम याठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करण्याचे काम सुरु झाले असल्याचे स्पष्ट करीत आयुक्त म्हणाले, शासनाच्या आदेशावरुन शहरातील खाजगी रुग्णांच्या खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. एक रुग्णालय भरले की पुढचे सुरू करायचे असे नियोजन केले जात आहे. शासनाच्या महात्मा फुले जीवनदायी योजना लागु असलेली खाजगी रुग्णालयातील खाटांची तयारी झाली असुन १४ खाजगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा, ४ खाजगी रुग्णालयातील ५० टक्के खाटा ताब्यात घेतल्या आहे.

महापालिकेकडे सध्या एकुण ६५०० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्यसंदर्भात जाणकारांच्या मते शहरातील रुग्णसंख्या ४००० पर्यत जाण्याची शक्यता आहे. या दृष्टीने रुग्णांच्या आरोग्य सेवेची तयारी केली आहे. शहरात वाढत असलेले रुग्णांची आकडेवारी ही आयसीएमआर पोर्टलवर सर्वासाठी उपलब्ध असुन यात कोणतीही लपवा लपवी होत नसल्याचेही आयुक्तांनी सांगितले.

करोनाच्या भितीने डॉक्टर हे भरतीत पुढे येत नसल्याबाबत खंत व्यक्त करीत आयुक्त म्हणाले, महापालिकेकडे सध्या कार्यरत असलेले १२५ व आरोग्य विभागाकडुन देण्यात आलेले १२५ डॉक्टर महापालिका रुग्णालयात कार्यरत आहे. जिल्हा शासकिय रुग्णालयाकडुन महापालिका क्षेत्रात काम करण्यासाठी २०० डॉक्टरांची भरतीची प्रक्रिया केल्यानंतर केवळ ३५ डॉक्टरांच्या जागा भरण्यात आल्या आहे.

लोकांमध्ये करोनाची भिती निर्माण झाली असुन ही भिती दूर करण्यासाठी जनजागृती करण्याची गरज असुन महापालिकेकडुन केली जात आहे. या कामी शहरातील एनजीओची मदत घेतली जाणार यातून नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी व मास्क लावणे, सामाजिक अंतर राखणे, गर्दीत जाणे टाळणे साध्या गोष्टी जनतेपर्यत पोहचविली जाणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com