अर्धनग्न आंदोलनाची मनपा आयुक्तांकडून दखल

अर्धनग्न आंदोलनाची मनपा आयुक्तांकडून दखल
USER

नाशिक । प्रतिनिधी

करोनाबाधितांकडून दहा लाखांचे बिल वसूल केल्यानंतरही दीड लाखाची अनामत रक्कम परत केली जात नसल्याने आआपाचे जितेंद्र भावे यांनी खासगी रुग्णालयात केलेल्या कपडे काढो आंदोलनाची महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दखल घेतली असून मुख्य लेखापरीक्षकांमार्फत चौकशी करण्याचे आदेश आयुक्त जाधव यांनी दिले आहे.

अशाप्रकारचे आंदोलन करण्याची वेळ का आली, याची कारणमीमांसा केली जाणार आहे. यात रुग्णालय व्यवस्थापन दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचे समजते. भावे यांच्या अनोख्या आंदोलनामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष नाशिककडे वेधले गेले आहे. महापालिकेने शहरातील सुमारे 170 कोविड रुग्णालयांमध्ये रुग्णांची बिले तपासण्यासाठी लेखापरीक्षकांची नियुक्ती केली आहे.

संबंधित खासगी रुग्णालय हे संवेदनशील असल्यामुळे व येथे बिलाच्या वारंवार तक्रारी होत असल्यामुळे या ठिकाणीदेखील जबाबदार लेखापरीक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे ही घटना घडली. त्यावेळी लेखापरीक्षक काय करत होते, तक्रारदारांनी लेखापरीक्षकांशी संपर्क साधला होता का, तक्रारदारांना काय प्रतिसाद मिळाला, पालिकेच्या लेखापरीक्षकाकडे न जाता थेट आंदोलन केले का? आदी प्रकरणाची मुख्य लेखा परीक्षकामार्फत चौकशी केली जाणार असल्याचे आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले.

भावेंसह 25 जणांवर गुन्हा

रूग्णालयातील गांधीगिरीनंतर मुंबईनाका पोलीस ठाणे येथे जमाव जमऊन घोषणाबाजी केल्या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे यांच्यासह सुमारे 25 कार्यकर्त्यांवर संचारंदी आदेशाचे उल्लंघन तसेच गैरकायद्याची मंडळी जमवणे व सार्वजनिक शांततेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सबंधीत रूग्णालय प्रशासनाला अमोल जाधव यांचे डिपॉझीट रक्कम परत करण्याबाबतही समज देण्यात आलीे आहे.

गरीब रूग्णांना मदत करणे गुन्हा आहे का? - शिंदे

करोना उपचार घेणार्‍या शहर आणि जिल्ह्यातील रूग्णांची कॉर्पोरेट रूग्णालयांकडून वैद्यकीय खर्चाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात लुट सुरू आहे, गरीब रूग्णांना त्यांचेच पैसे मिळवून देत मदत करणे हा काय गुन्हा आहे का? मग यामध्ये आंदोलन करणार्‍या भावे यांचे काय चुकले? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत. याची उत्तरे पोलीस तसेच शासनाने द्यावीत भावे यांना डांबून ठेवले आणि त्यांच्यावर दडपशाहीचा वापर केल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी येथे केला.

शासकीय विश्रामगृहाच्या प्रांगणात बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत धनंजय शिंदे यांनी प्रसिद्धमाध्यमांशी संवाद साधत हे प्रश्न उपस्थित केले. कॉर्पोरेट रूग्णालयांकडून गरीब रूग्णांना दिलासा मिळावा यासाठी आम आदमी पक्षाचे प्रवक्ते जितेंद्र भावे यांनी मंगळवारी (दि. 25) अर्धनग्न आंदोलन करत हा मुद्दा चव्हाट्यावर आणला होता.

कुठलाही गुन्हा केलेला नसताना सरकारने पोलिसांच्या माध्यमातून जितेंद्र भावे यांना विनाकारण पोलीस ठाण्यात डांबुन ठेवले आणि त्यांच्यावर दडपशाहीचा वापर केला. वैद्यकीय क्षेत्रात मोठा काळाबाजार घडत असून त्यात सुधारणा न करता त्यास खतपाणी घातले जात असल्याचा आरोप यावेळी केला. या पत्रकार परिषदेस पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे, प्रवक्ते जितेंद्र भावे यांच्यासह विनायक येवले, नितीन शुक्ल, कुंतल कापडणीस आदि उपस्थित होते.

खासगी रुग्णालयांच्या मनमानीविरोधात शिवसेनेने आवाज उठविल्यानंतर महापालिकेने सर्व खासगी रुग्णालयांमध्ये लेखापरिक्षकांची नेमणूक केली. मात्र पुन्हा तक्रारी येत आहेत. रुग्णांची आर्थिक पिळवणूक करणार्‍या खासगी रुग्णालयांविरोधात प्रशासनाने कठोर कारवाई न केल्यास शिवसेनेला आक्रमक व्हावे लागेल.

अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेते, मनपा

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com