मनपा आयुक्त गमेंकडून तक्रारींची शहनिशा
नाशिक

मनपा आयुक्त गमेंकडून तक्रारींची शहनिशा

थेट कोविड रुग्णालयात पॉझिटिव्ह रुग्णांची विचारपूस

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

तुमची नियमित डॉक्टरांकडून तपासणी केली जाते का? तुम्हाला जेवण वेळेवर दिले जाते का? तुमची प्रकृती कशी आहे ? जे खरे आहे ते सांगा? अशाप्रकारे विचारपूस महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी कोविड रुग्णालयातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या कक्षात जाऊन केली. त्यास सकारात्मक उत्तरेदेखील मिळाली. याठिकाणी रुग्णांनी वास्तव उपचाराची माहिती दिली. तसेच यानिमित्ताने रुग्णांना आयुक्तांनी दिलासा देतांनाच याठिकाणी आयुक्तांच्या भेटीमुळे वैद्यकीय अधिकार्‍यांसह आरोग्य सेवकांचे मनोबल वाढले.

नाशिक शहरातील डॉ.जाकीर हुसेन रुग्णालयासह इतर रुग्णालयात करोनाबाधित रुग्णांवर चांगले लक्ष दिले जात नाही, जेवण वेळेवर दिले जात नाही,अशा तक्रारी रुग्णांच्या काही नातेवाईकांनी आयुक्तांकडे केल्या होत्या. याच पार्श्वभूमी आरोग्यसेवक व रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी आयुक्तांनी सोमवारी डॉ.झाकीर हुसेन हॉस्पिटल व समाज कल्याण करोना कक्ष येथे अचानक भेट दिली. पीपीई किट परिधान करून वैद्यकीय अधिकांर्‍यासह आयुक्तांनी कक्षात रुग्णांना तेथे दिल्या जाणार्‍या सुविधांची विचारणा केली.

रुग्णांना देण्यात येणारा काढा, गरम पाणी, जेवणाची व्यवस्था याबाबत चर्चा करून त्याबाबत खात्री करून घेतली. वेळोवेळी वैद्यकीय अधिकार्‍यांकडून तपासण्या केल्या जात असल्याबाबतची खात्री केली. तसेच या रुग्णालयात औषधांचा पुरवठा, सेवकांची असणारी व्यवस्था याबाबत पाहणी करण्यात आली. यावेळी डॉ. नितीन रावते यांनी या रुग्णालयातील व्यवस्थे विषयी माहिती दिली.तसेच समाजकल्याण करोना कक्ष येथे जेवणाची व्यवस्थेबाबत पाहणी केली.

तसेच त्या ठिकाणी दिले जाणारे जेवण याबाबतची तपासणी करून केटरिंगवाल्यांशी चर्चा करण्यात आली. रुग्णांना जेवण देण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यांच्या समवेत करोना कक्ष अधिकारी डॉ.आवेश पलोड, डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयाचे डॉ.नितीन रावते, समाजकल्याण करोना कक्ष येथील डॉ. गरुड हे उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com