नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहराचे पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी महापालिकेच्या शहर बससेवेकरिता घेतल्या जाणार्या बसेस या बीएस सिक्स तंत्रज्ञानाच्या घ्याव्यात, अशी मागणी स्थायी समिती सदस्यांनी केली. सेनेचा विरोध लक्षात घेत स्थायी समितीच्या परवानगीशिवाय बससेवा सुरू करू नका, असे निर्देश सभापती गणेश गिते यांनी आज प्रशासनाला दिले.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला महापालिका शहर बससेवा नाशिक महापालिकेमार्फत नवीन वर्षात 26 जानेवारी रोजी सुरू होणार आहे. केंद्र शासनाने मार्चनंतर प्रदूषणाला हातभार लावणार्या बीएस फोर या तंत्रज्ञानाच्या सर्व प्रकारच्या वाहनांवर बंदी असताना महापालिका प्रशासनाने बीएस फोरला पसंती दिली आहे.

स्वच्छ व सुंदर नाशिकच्या पर्यावरणाला बाधा पोहोचणार आहे. आज बीएस फोर तंत्रज्ञानाच्या बसेसमुळे प्रदूषण वाढणार असल्याचा मुद्दा शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांनी उपस्थित केला. प्रसंगी त्यासाठी वाढीव पैसे देण्याची आमची तयारी आहे, असे बडगुजर यांनी सांगितले. तसेच बेस्ट बससेवा चालवणार्या समितीने कशा पद्धतीने बीएस सिक्स तंत्रज्ञानाचा दाखला दिला.

एकूणच चर्चा व सदस्यांच्या भावना लक्षात घेत सभापती गिते यांनी स्थायी समितीच्या पूर्वपरवानगीशिवाय बससेवा सुरू करू नका, असे आदेश प्रशासनाला देतानाच यासंदर्भात सविस्तर अहवाल पुढील सभेत ठेवण्याचे निर्देश दिले.

ईदगाहऐवजी पर्यायी जागा शोधा

महापालिका प्रशासनाकडून बससेवेकरता ईदगाह मैदानालगत बससेवा टर्मिनल साकारण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. ही जागा मुस्लीम बांधवांच्या नमाज पठणासाठी राखीव असल्याने यास विरोध होत आहे. तसेच आज हे टर्मिनल अन्यत्र स्थलांतरित करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका समीना मेमन यांनी केली. या चर्चेनंतर सभापती गिते यांनी याकरता पर्यायी जागा शोधा व टर्मिनल बांधा असे आदेश प्रशासनाला दिले. यात अगोदर सेनेकडून बीएस फोर तंत्रज्ञानाच्या बसेसला विरोध झाल्यामुळे आता मनपा बससेवेचा मुहूर्त हुकण्याची शक्यता आहे.