शहरात म्युकॉर मायकॉसीस बुरशीचा प्रादुर्भाव; करोना उपचार पश्चात डोळे, नाक यावर परिणामाची शक्यता

शहरात म्युकॉर मायकॉसीस बुरशीचा प्रादुर्भाव; करोना उपचार पश्चात डोळे, नाक यावर परिणामाची शक्यता

नाशिक। प्रतिनिधी

जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत असून यातच एका रूग्णास डोळ्यात जखमा आढळल्याने याबाबत विविध चर्चा सुरू झाली आहे. परंतु ही म्युकॉर मायकॉसीस नावाची बुरशी आहे. या बुरशीचे परिणाम डोळे तसेच नाकावर होण्याची शक्यता असते. मात्र वेळीच लक्षणे ओळखून योग्य ती काळजी घेतल्यास ती रोखता येते असे पॅथॉलॉजिस्ट तथा आयएमएचे माजी अध्यक्ष सुधीर संकलेचा यांनी सांगितले...

याबाबत बोलताना संकलेचा म्हणाले की, कोरोना उपचार पुर्ण झाल्यानंतर सजग रहावे, नाकातून घाण येत असेल, नाकाच्या आत तसेच भोवती दुखत असेल व चक्कर येत असतील तर लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवून घ्यावे, योग्य उपचारांनी ती नियंत्रणात येते.

काही मधुमेह असणार्‍या रूग्णांमध्ये कोवीडचे उपचार पुर्ण झाल्यानंतर डोळ्यात जखमा असल्याचे आढळले आहे. याबाबत मोठ्या चर्चा तसेच गैरसमज पसरत आहेत.

वास्तविक पोस्ट कोविड म्युकॉर मायकॉसीस ही बुरशी आहे. कोवीडच्या उपचारांमध्ये ज्या रूग्णांना मधुमेह आहे. या रूग्णांना कोवीडमधून बरे पडल्यानंतर त्यांची प्रतिकारक शक्ती कमी झालेली होती.

यामुळे या बुरशीची त्यांच्या नाकाच्या पोकळ्यांमध्ये वाढ झाल्याचे आढळले आहे. यामुळे डोळ्यांच्या मागचा भागात तीच प्रादुर्भाव होतो. यामुळे यात डोळा तसेच नाकावर शस्त्रक्रिया करावी लागते.

ही बुरशी हाडांनाही प्रभावीत करते. काही रूग्णांच्या दाताच्या खाली तीची वाढ होऊन थेट दात निखळून पडण्याची शक्यताही असते.

तेथून ते मेंदूच्या नसेत जाते. नाशिक शहरात सरासरी दररोज 5 ते 6 रूग्णांमध्ये याचे काही प्रमाण आढळत आहे. हे का होते यावर संशोधन सुरू आहे.

याला उपचार ही शस्त्रक्रिया आहे. यात डोळा, नाक काढावे लागते. यातून रूग्ण वाचण्याची शक्यता असते.

तसेच एमफोटेरिसीन बी हे औषध द्यावे लागते. परंतु सध्या या औषधाची मोठी कमतरता असून हे औषध तात्काळ पुरशा प्रमाणात उपलब्ध करण्याची गरज असल्याचे संकलेचा यांनी म्हटले आहे.

या आहेत शक्यता

ऑक्सीजनची नळीमध्ये बुरशी असण्याची शक्यता आहे. ही नळी आपण थेट रूग्णाच्या नाकात टाकली जाते. त्यातून ही बुरशी नाकात जाऊ शकते असा अंदाज व्यक्त होत आहे. दुसरी बाबत म्हणजे मेडिकल ऑक्सीजन हा 92 ते 93 टक्के शुद्ध असतो. तर आपण आता वापरत असलेला औद्योगिक ऑक्सीजन हा 99 टक्के शुद्ध असतो. यामुळे ही बुरशी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शरिरातील फेरीटीन नावाचे द्रव्य या बुरशीला वाढ करण्यास मदत करते. कोवीडमध्ये या फेरीटीनची लेवल वाढते यामुळे ही वाढ होते असे मानले जात आहे.

- डॉ. सुधीर संकलेचा, नाशिक

दक्षता हाच उपाय

* कोरोना उपचारानंतर दक्ष रहा

* नाकातून घाण येते असेल

* नाकाभवती दुखत असेल

* चक्कर येतात असतील तर लगेच डॉक्टरांकडे जा

* कान, नाक, घशाच्या दुखन्यांकडे दुर्लक्ष करून नका

* खुप दिवस ऑक्सीजन लावला होता का

* खूप स्टेरॉईड घेतले आहेत का

* वयोवृद्धांवर, मधुमेहाचे रूग्ण असतील तर अधिक लक्ष द्या

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com