‘एमपीएससी’चा भार दोन सदस्यांवर!

एमपीएससी
एमपीएससी

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणार्‍या परीक्षा, मुलाखती आणि धोरणात्मक निर्णयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या आयोगाच्या सदस्यांच्या नेमणुका दोन वर्षांपासून खोळंबल्या आहेत. त्याचा फटका स्थापत्य अभियांत्रिकी सेवेच्या अर्हताप्राप्त उमेदवारांच्या मुलाखतीला बसला आहे.

मुलाखतीच्या ‘पॅनल’चे अध्यक्ष असणारे दोनच सदस्य असल्याने प्रत्यक्ष मुलाखती घेण्याच्या निर्णयाला बगल देत आयोगाने आता गटचर्चेद्वारे मुलाखती घेण्याचा प्रस्ताव दिला आहे.

राज्य लोकसेवा आयोगामध्ये सहा सदस्यांची समिती असते. मात्र, सध्या आयोगाचा भार हा केवळ दोन सदस्यांच्या खाद्यांवर आहे. डिसेंबर 2017 आणि जून 2018 मध्ये दोन सदस्य निवृत्त झाल्यापासून सरकारने सदस्यांची नेमणूकच केलेली नाही.‘एमपीएससी’तर्फे घेण्यात येणार्‍या मुलाखतीच्या ‘पॅनल’मध्ये आयोगाचा सदस्य हा अध्यक्ष असतो. या सहा सदस्यांचे सहा पॅनल तयार करून मुलाखती घेतल्या जातात.

मात्र, सध्या आयोगाकडे दोनच सदस्य असल्याने दोन पॅनल तयार करून मुलाखती घेण्याची वेळ आयोगावर आली आहे. लोकसेवा आयोगातर्फे 2019 मध्ये घेण्यात आलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षांसाठी अर्हताप्राप्त उमेदवारांची संख्या 3600 च्या घरात आहे. एवढया मोठया संख्येने असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेणे दोन पॅनलला शक्य नाही. त्यामुळे लहान गट बनवून गटचर्चेचा प्रस्ताव आयोगाने उमेदवारांसमोर ठेवला आहे.

आयोगामधील चार सदस्य निवृत्त झाले असून सध्या अध्यक्षपदी गवई व सदस्य म्हणून मेश्राम असे दोनच सदस्य आहेत. आयोगाचे सदस्य हे संविधानिक पद असून राज्यपालांकडून या सदस्यांची नियुक्ती केली जाते. मुख्यमंत्र्यांकडून नावांची शिफारस केली जाते. महाविकास आघाडी सरकारकडे सदस्यत्वासाठी इच्छुकांचे अर्ज आलेले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com