
नाशिक | Nashik
सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न चांगलाच गाजत असून मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलने, उपोषण सुरु केली आहेत. तसेच राज्यभरात मराठा आंदोलकांनी राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केली असून अनेक पक्षातील कार्यकर्ते आणि नेते यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपल्या पदाचा राजीनामा (Resignation) देण्यास सुरुवात केली आहे...
काल शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहीत आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मण पवार (MLA Laxman Pawar) यांनीही मराठा आरक्षणासाठी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहित आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. यानंतर आता नाशिकचे शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पत्र लिहून आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने नाशिक शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ गेल्या ४८ दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. आज या आंदोलकांना भेटण्यासाठी खासदार हेमंत गेाडसे आले होते. त्यावेळी आंदोलकांनी गोडसे यांना जाब विचारत समाजासाठी राजीनामा (Resignation) द्या अशी मागणी केली होती.त्यानुसार हेमंत गोडसे यांनी राजीनामा दिला असून तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला आहे.
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर नाशिकमध्ये (Nashik) आंदोलन सुरू करण्यात आले होते. दोन दिवसांपासून आंदोलकांपैकी नाना बच्छाव यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. दिवसेंदिवस नाशिकमध्ये आंदोलन तीव्र होत असून दीडशेहुन अधिक गावांत राजकीय नेते आणि मंत्र्यांना गावबंदी करण्यात आली आहे. उलट समाजाच्या आक्रमक भूमिकेमुळे अनेक मंत्र्यांचे दौरे आणि कार्यक्रम रद्द होत आहेत. याच ठिकाणी आज खासदार गोडसे आंदोलकांना भेटण्यासाठी आले असता आंदोलकांनी संताप व्यक्त केला.
त्यानंतर आंदोलकांनी गोडसे यांना समाजासाठी तुम्ही खासदारकीचा राजीनामा द्या, तुम्हाला आम्ही पुन्हा निवडून आणू असे सांगितले. यानंतर खासदार हेमंत गोडसे यांनी पक्षाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे राजीनामा दिला असून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पाऊले उचलावित अशी मागणी केली आहे.